

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज (गुरुवारी) होणार आहे. यापूर्वी मागील आठवड्यात सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस हे प्रकरण वेळापत्रकात होते मात्र सुनावणीपर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, आज (गुरुवारी) एक आठवड्यानंतर पुन्हा हे प्रकरण न्यायालयाच्या वेळापत्रकात आहे. दोन्ही सुनावण्या एकाच दिवशी होणार असल्या तरी दोन्ही सुनावण्या स्वतंत्रपणे होणार आहेत. (MLA disqualification case)
यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण यांची सुनावणी एकाच दिवशी होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची तारीख १९ सप्टेंबर दाखवण्यात आली आहे. मात्र गुरुवारी देखील हे प्रकरण सुनावणी पर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे. आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाला, राष्ट्रवादी शरद पवार गटाला जर लवकर सुनावणी हवी असेल तर या प्रकरणावर तातडीची सुनावणी हवी आणि ती का हवी हे न्यायालयाला सांगावे लागेल, हे प्रकरण नमूद करून घ्यावे लागेल.