

Transport Minister Surprise Inspection : प्रवास एसटीचा असो की शहरातील महापालिका बसचा, यातून प्रवास करताना सर्वसामान्यांना होणारा त्रास ही आपल्याकडे गृहीत धरलेलीच बाब आहे. कधी बस उशिरा येणे, तर कधी किरकोळ गोष्टींवरून बसचालक आणि वाहकांशी प्रवाशांची वादावादी होणे या नेहमीच कानावर पडणाऱ्या गोष्टी. अनेकवेळा हे प्रसंग अगदी हातघाईवरही येतात; पण विचार करा, असाच धक्कादायक अनुभव खुद्द राज्याच्या परिवहन मंत्र्यांनाच आला तर? ऐकायला अजब वाटेल, पण अशीच घटना कर्नाटकमध्ये प्रत्यक्षात घडली आहे. मंत्र्यांच्या या 'रिअॅलिटी चेक'मुळे सध्या कर्नाटकच्या परिवहन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री बैरथी सुरेश यांनी शनिवारी रात्री कोणत्याही सुरक्षेशिवाय, छुप्या वेषात एका सामान्य प्रवाशासारखा बेंगळुरूच्या 'बीएमटीसी' (BMTC) बसने प्रवास केला. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेत सर्वसामान्य प्रवाशांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, हे जाणून घेणे हा यामागील हेतू होता. यासाठी बैरथी सुरेश यांनी शनिवारी रात्री बेंगळुरूच्या बसेसमध्ये छुप्या वेषात (अंडरकव्हर) प्रवास केला. एका साध्या प्रवासाने सुरू झालेली ही मोहीम काही वेळातच नाट्यमय वळणावर पोहोचली.
या छुप्या तपासणीदरम्यान मंत्र्यांचा सामना प्रवाशांच्या नेहमीच्या समस्येशी झाला. हेब्बाल ते नागशेट्टीहल्ली या मार्गावरील बसने प्रवास करत असताना त्यांनी तिकीट काढण्यासाठी बस कंडक्टरकडे १०० रुपयांची नोट दिली. मात्र, वाहकाने सुट्टे पैसे नसल्याचे कारण सांगत त्यांना तिकीट देण्याऐवजी थेट बसमधून उतरण्यास सांगितले. अनेक प्रवाशांना रोज भेडसावणाऱ्या या समस्येचा थेट अनुभव मंत्र्यांनी स्वतः घेतला.
राज्याचे परिवहन मंत्री बैरथी सुरेश यांनी शनिवारी रात्री सुमारे दोन तास १० पेक्षा जास्त बीएमटीसी बसेसमधून गुप्तपणे प्रवास केला. या दरम्यान त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या स्वतः अनुभवल्या. यातील सर्वात गंभीर घटना तेव्हा घडली, जेव्हा एका प्रवाशाने उतरण्याचा इशारा करूनही बस चालकाने 'फन वर्ल्ड' बस स्थानकावर बस थांबवली नाही. यावर तात्काळ कारवाई करत मंत्री सुरेश यांनी संबंधित चालक आणि वाहक या दोघांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले.
मंत्र्यांची ही मोहीम केवळ बस प्रवासापुरती मर्यादित राहिली नाही. नागशेट्टीहल्ली येथे बसमधून उतरल्यानंतर सुरेश यांनी एका ऑटो-रिक्षा चालकासोबत सुरू असलेल्या वादातही हस्तक्षेप केला. त्या रिक्षाच्या मीटरवर ३० रुपये भाडे दिसत असतानाही चालक प्रवाशाकडून ३६ रुपयांची मागणी करत हुज्जत घालत होता.
या संपूर्ण मोहिमेला 'रिअॅलिटी चेक' म्हणत परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, "कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढवण्यासाठी, त्यांच्यात शिस्त आणण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी बेंगळुरूमध्ये अशा प्रकारच्या आकस्मिक तपासण्या यापुढेही सुरूच राहतील." कर्नाटक सरकारच्या या गुप्त मोहिमेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार आता अधिक कडक पावले उचलणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.