

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मेक्सिकोने मुक्त व्यापार करार नसलेल्या देशांमधून आयात होणार्या मालावर 5 टक्के ते तब्बल 50 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट फटका भारत, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशिया यासारख्या प्रमुख निर्यातदार देशांना बसणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून ही शुल्कवाढ लागू होण्याची शक्यता असल्याने, यामुळे प्रभावित झालेल्या भारतीय उद्योगांनी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे.
ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातदार संस्थांनी सरकारच्या मदतीसाठी पत्रे लिहिली आहेत. काही निर्यातदार मेक्सिकोसोबत तातडीने मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू करावी, अशी मागणी करत आहेत; तर काही कंपन्या या संकटावर मात करण्यासाठी पुरवठा साखळीचे मार्ग बदलण्याचा विचार करत आहेत. मेक्सिकोने अजून उत्पादनानुसार शुल्काचे दर स्पष्ट केलेले नसल्याने वस्त्रोद्योग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील निर्यातदारांमध्ये मोठे अनिश्चिततेचे वातावरण आहे.
‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’च्या मते, भारताची मेक्सिकोला होणारी 5.75 अब्ज डॉलरची जवळपास 75 टक्के निर्यात या शुल्कवाढीमुळे प्रभावित होईल. सध्याचा 0-15 टक्के असलेला टॅरिफ दर सुमारे 35 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. विशेषतः, कापड, वस्त्रे आणि सिरॅमिक्ससारख्या श्रमकेंद्रित क्षेत्रांना 25 टक्के ते 35 टक्क्यांपर्यंत शुल्कवाढीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे अनेक निर्यातदारांवर गंभीर संकट ओढवले आहे.
इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने मेक्सिकोच्या बाजारपेठेचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन तातडीने चर्चा सुरू करण्याची विनंती केली आहे. तसेच, अमेरिकेच्या अलीकडील शुल्क कारवाईनंतर, एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या काळात मेक्सिकोला होणार्या भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत 12 टक्के घट झाली आहे. यामध्ये स्टील (-7 टक्के), ऑटो घटक (-20 टक्के) आणि दुचाकी-तीनचाकी वाहने (-32 टक्के) यासारख्या श्रेणींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
ऑटो क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित होण्याची अपेक्षा आहे. मेक्सिको हा दक्षिण आफ्रिका आणि सौदी अरेबियानंतर भारताचा तिसरा सर्वात मोठा कार निर्यात बाजार आहे. गेल्या आर्थिक वर्षात, भारताने मेक्सिकोला सुमारे 2 अब्ज डॉलर किमतीची 1.94 लाख प्रवासी वाहने निर्यात केली होती. स्कोडा ऑटो, ह्युंदाई, मारुती सुझुकी आणि बजाज ऑटो यासारख्या कंपन्यांसाठी मेक्सिको हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. ऑटो उद्योगाच्या प्रमुख लॉबीने सरकारने मेक्सिकोच्या सरकारकडे हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.
1) मेक्सिकोने मुक्त व्यापार करार नसलेल्या देशांच्या वस्तूंवर 5 टक्के ते 50 टक्क्यांपर्यंत शुल्क लादले.
2) भारताच्या 5.75 अब्ज डॉलरच्या निर्यातीपैकी 75 टक्के भाग प्रभावित होण्याची शक्यता.
3) ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी आणि सिरॅमिक्स क्षेत्राला सर्वाधिक फटका.
4) भारतीय उद्योगांकडून सरकारकडे तातडीने चर्चा सुरू करण्याची मागणी.