

मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळानंतर 'अर्जेंटिना फॅन क्लब'चे अध्यक्ष उत्तम साहा यांनी तथ्यहीन आरोप केल्याचा गांगुलीचा दावा
कार्यक्रमाच्या आयोजनात गांगुलीने मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा साहांचा दावा
सौरव गांगुलीने कोलकाता येथील लालबाजार पोलीस मुख्यालयात आपली नोंदवली तक्रार
Messi's India tour
कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (CAB) अध्यक्ष सौरव गांगुलीने 'अर्जेंटिना फॅन क्लब'चे अध्यक्ष उत्तम साहा यांच्यावर ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोलकाता येथील युवा भारती क्रीडांगणावर लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळावरून साहा यांनी गांगुलीवर तथ्यहीन आरोप केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.
शनिवार, १३ डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी कोलकाता भेटीवर आला होता. मात्र, युवा भारती क्रीडांगणावरील या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर उत्तम साहा यांनी सार्वजनिकरित्या सौरव गांगुलीवर गंभीर आरोप केले होते. या कार्यक्रमात गांगुलीने मध्यस्थाची भूमिका बजावली असून या प्रकरणाशी त्याचा जवळचा संबंध असल्याचा दावा साहा यांनी केला होता.
सौरव गांगुलीने कोलकाता येथील लालबाजार पोलीस मुख्यालयात आपली तक्रार नोंदवली आहे. साहा यांनी केलेले विधान "खोटे, द्वेषपूर्ण आणि मानहानीकारक" असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. आपण या कार्यक्रमाला केवळ एक 'पाहुणा' म्हणून उपस्थित होतो. कार्यक्रमाच्या आयोजनाशी किंवा व्यवस्थापनाशी त्याचा कोणताही अधिकृत संबंध नव्हता. तथ्यहीन आरोपांमुळे आपल्या प्रतिमेला मोठी बाधा पोहोचली असल्याचे गांगुलीने नमूद केले आहे.
मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'X' (ट्विटर) वरून मेस्सी आणि फुटबॉल चाहत्यांची माफी मागितली होती. दरम्यान, या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक शतद्रू दत्ता याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.