

Mehbooba Mufti on Kashmiri Pandits : काश्मीरी पंडितांनी भूतकाळात त्यांच्यासोबत जे काही घडले ते विसरून गेले पाहिजे, असा सल्ला आवाहन जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी केले. वार्षिक मेळाव्यानिमित्त माता खीर भवानी मंदिरात पूजा केल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. दरम्यान, महबूबा मुफ्ती यांच्या विधानाला भाजपने टीका केली आहे.
खीर भवानी मंदिरात काश्मीरी पंडितांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पीडीपी प्रमुख म्हणाल्या की, काश्मीरी पंडितांनी खोऱ्यात एका सामायिक भविष्याच्या दिशेने काम केले पाहिजे आणि भूतकाळाच्या विळख्यातून बाहेर पडून पुढे सरकले पाहिजे. आमच्या काश्मीरी पंडित बंधू-भगिनींना येथे (माता खीर भवानी मंदिरात) आलेले पाहून मला खूप आनंद होत आहे. त्यांनी भविष्याकडे पाहिले पाहिजे आणि भूतकाळात जे काही घडले ते विसरून गेले पाहिजे.”
“माझे असे मत आहे की तरुण काश्मीरी पंडित डॉक्टरांनी काश्मीरमध्ये आले पाहिजे आणि येथील लोकांशी जोडले गेले पाहिजे. जम्मू-काश्मीर सरकारने त्यांना आवश्यक सुविधा पुरवल्या पाहिजेत. बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे. ज्या शक्ती काश्मीरी पंडितांच्या अडचणींचा फायदा घेऊ इच्छितात, त्यांना बाजूला केले पाहिजे.”
जम्मू-काश्मीरचे भाजप नेते जहानझैब सिरवाल यांनी पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्या टिप्पणीवर टीका केली आहे. ते म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशात आपण अशा परिस्थितीची निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे, ज्यामुळे विश्वास वाढेल, जखमा भरून निघतील आणि प्रत्येक समुदायाला आदर व सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. जम्मू-काश्मीरचे भविष्य हे सलोखा, परस्पर आदर आणि जखमा भरून काढण्याच्या भावनेवर आधारित असले पाहिजे, तरीही काश्मीरी पंडित समुदायाच्या वेदना आणि त्रासाकडे 'फक्त भूतकाळ विसरून जा' असे म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.