

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती अद्यापही कायम आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांना पुराचा मोठा फटका बसला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दुसरीकडे, हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीय वार्यांच्या स्थितीमुळे पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगा आणि यमुनेसह प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हथिनीकुंड बॅराजमधून पाणी सोडण्यात आल्याने मथुरा आणि वृंदावनमधील जवळपास 50 टक्के भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. येथील प्रसिद्ध राधा वल्लभ मंदिरातही पाणी शिरले आहे.
हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील हिसार-घग्गर मल्टिपर्पज ड्रेनला बुधवारी पुन्हा एकदा भगदाड पडले. सुमारे 50 फूट रुंद भगदाड पडल्याने पुराचे पाणी शेतात घुसले आणि जवळपास 300 एकर शेतातील पीक पाण्याखाली गेले आहे. छत्तीसगडच्या रायपूर येथे विमानतळावर वीज कोसळल्याने नेव्हिगेशन प्रणालीत मोठा बिघाड झाला. या तांत्रिक समस्येमुळे 5 विमानांना दुसर्या विमानतळावर उतरवण्यात आले किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले.