Spain Tsunami Risk | स्पेनमधील ज्वालामुखीमुळे महाकाय त्सुनामीचा धोका; अमेरिकेचा पूर्व किनारा उद्ध्वस्त होण्याची भीती

Spain Tsunami Risk |
Spain Tsunami Risk | स्पेनमधील ज्वालामुखीमुळे महाकाय त्सुनामीचा धोका; अमेरिकेचा पूर्व किनारा उद्ध्वस्त होण्याची भीती
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : स्पेनच्या कॅनरी बेटांवरील अस्थिर ज्वालामुखीचा मोठा भूभाग समुद्रात कोसळल्यास अटलांटिक महासागरात महाकाय त्सुनामी निर्माण होऊ शकते. या त्सुनामीचा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला मोठा फटका बसण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या लाटा अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंत अवघ्या नऊ तासांत पोहोचू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ज्वालामुखी अभ्यासक प्रा. बिल मॅकग्वायर हे कॅनरी बेटांवरील ‘कुंब्रे व्हिएखा’ या ज्वालामुखीचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या मते, ज्वालामुखीच्या समुद्राकडे झुकलेल्या बाजूचा (फ्लँक) मोठा खडकाळ भाग हळूहळू सरकत आहे. हा भाग समुद्रात कोसळल्यास प्रचंड प्रमाणात पाणी विस्थापित होऊन महाकाय त्सुनामी निर्माण होऊ शकते. मॅकग्वायर यांच्या संगणकीय प्रारूपानुसार, अशा संभाव्य त्सुनामीच्या लाटा ६५ फूटांपर्यंत उंच असू शकतात. या लाटा ताशी प्रचंड वेगाने अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर धडकू शकतात.

या संभाव्य धोक्याच्या समर्थनार्थ संशोधक बहामासच्या किनारपट्टीवर आढळलेल्या मोठ्या शिळांचा दाखला देतात. प्राचीन काळातील त्सुनामीमुळे या शिळा किनाऱ्यावर पोहोचल्या असाव्यात, असा भूगर्भशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र, ही आपत्ती नजीकच्या काळात घडण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ज्वालामुखीचा भूभाग समुद्रात कोसळण्यास शेकडो किंवा हजारो वर्षेही लागू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.