INS Brahmaputra : मुंबईत INS ब्रह्मपुत्रा युद्धनौकेला आग, एक खलाशी बेपत्ता
पुढारी ऑनलाईन डेस्क : INS Brahmaputra : भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेची दुरुस्ती सुरू होती. यादरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर एक कनिष्ठ खलाशी बेपत्ता आहे. बचाव पथक त्याच्या शोध घेत आहेत.
आग आटोक्यात
नौदल डॉकयार्ड आणि बंदरातील इतर जहाजांच्या तांत्रिक पथकांनी आग आटोक्यात आणली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून नुकसानीचा अंदाजही घेतला जात आहे, अशी माहिती नौदलाने दिली आहे. या अपघातामुळे जहाज एका बाजूला झुकले आहे. सूत्रांनी सांगितले की, सर्व प्रयत्न करूनही जहाज सरळ स्थितीत आणले जाऊ शकले नाही. बेपत्ता खलाशाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
याआधी 19 जुलै रोजी गोव्याच्या किनाऱ्याजवळ मर्चंट नेव्हीच्या जहाजाला आग लागली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जहाजावर 22 क्रू मेंबर होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. हे जहाज गुजरातमधील मुंद्रा येथून श्रीलंकेतील कोलंबोला जात होते. त्यात बेंझिन आणि सोडियम सायनेटसारखे धोकादायक पदर्थांचा साठा होता. समुद्रात लागलेली ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी डॉरझियर विमानेही तैनात करण्यात आली होती.
