

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : 1990 च्या दशकात जम्मू आणि काश्मीरमधील एका उच्च-सुरक्षित तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता आणि त्यानंतर कठोर शिक्षा भोगावी लागल्याची कबुली जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने सार्वजनिकरीत्या दिली आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हा खुलासा अझरच्या भाषणाच्या एका ऑडिओ क्लिपमधून समोर आला आहे, जे भाषण त्याने पाकिस्तानातील एका सार्वजनिक सभेत दिले असल्याचे मानले जाते. गुप्तचर सूत्रांनी या क्लिपच्या सत्यतेची पुष्टी केली आहे. यात हा मोस्ट वाँटेड दहशतवादी सांगतो की, कशाप्रकारे त्याची पळून जाण्याची योजना शेवटच्या क्षणी अयशस्वी झाली आणि त्यामुळे भारतीय तुरुंग अधिकार्यांची भीती त्याच्या मनात आजही कायम आहे. बोगद्यातून पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तुरुंग अधिकार्यांनी कठोर कारवाई करत शारीरिक शिक्षा दिली.
या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये मसूद अझरने वर्णन केले आहे की, कशाप्रकारे त्याने आणि जम्मूच्या कोट भलवाल तुरुंगातील इतर कैद्यांनी तुरुंगातच कुठूनतरी मिळवलेली साधने वापरून एक बोगदा खोदण्याचा प्रयत्न केला होता. हे उच्च सुरक्षित तुरुंग भारतीय सैन्याने पकडलेल्या काही सर्वात धोकादायक दहशतवाद्यांना ठेवण्यासाठी ओळखले जाते. पळून जाण्याची योजना काळजीपूर्वक आखण्यात आली होती आणि त्यासाठी एक विशिष्ट दिवसही निवडण्यात आला होता; मात्र योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच अधिकार्यांनी हा बोगदा शोधून काढला.