

पुढारी ऑनलाईन :
देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुलाल, अबीर आणि फुलांची उधळण करून ही होळी साजरी केली जाते. तर काशी म्हणजेच बनारसमध्ये चितेच्या राखेने होळीचा सण साजरा केला जातो. बनारसची मसानची होळी रंगांच्या होळीच्या काही दिवस आधी खेळली जाते. मसान होळीच्या दिवशी काशीच्या हरिश्चंद्र आणि मणिकर्णिका घाटावर साधू, संत आणि महादेवाचे भक्त पूजेनंतर 'हर हर महादेव' चा जयजयकार करत चितेच्या राखेपासून होळी खेळतात. हे दृष्य अत्यंत विचित्र असे असते. मसानची होळी ही मृत्यूचा उत्सव साजरा करण्यासारखे आहे. मसान होळी याचे प्रतिक आहे की, जेंव्हा मनुष्य आपल्यातील भीतीवर मात करून मृत्यूच्या भीतीला पाठीमागे सोडून देतो. तेंव्हा तो जीवनाचा असाच आनंद साजरा करतो. (Masane Ki Holi)
या वर्षी मसानची होळी ११ मार्च २०२५ रोजी साजरी केली जात आहे. मसानची होळी रंगभरी एकादशीच्या एक दिवसानंतर खेळली जाते. रंगभरी एकादशी दिवशी रंग, गुलाल-अबीर आणि फुलांच्या माध्यमातून ही होळी खेळली जाते. या दिवशी काशी विश्वनाथाची विशेष साज-श्रृंगार पूजा बांधली जाते. तर दुसर्या दिवशी काशीमध्ये मसानवाली होळी खेळली जाते. ज्यामध्ये गुलालासोबतच चितेची राख असते. धार्मिक मान्यतेनुसार यावेळी काशीचे भगवान शिव स्वत:हा होळी खेळण्यासाठी येतात. तर जाणून घेवुयात मसान होळीशी संबंधित पौराणिक कथा काय आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, रंगभरी एकादशी दिवशी भगवान महादेव हे माता पार्वती यांना विवाहानंतर पहिल्यांदा काशी येथे घेवून आले. तेंव्हा महादेव आणि माता गौरी यांच्या काशीमध्ये येण्याच्या आनंदात देवता-गणांनी दिप आरती सोबतच फूल, गुलाल आणि अबीर उडवून त्यांचे स्वागत केले. मात्र महादेवाने भूत-प्रेत, यक्ष, गंधर्व आणि अघोरी यांच्यासोबत होळी खेळू शकले नव्हते. यानंतर भोळ्या महादेवाने रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी भूत-पिशाच्यांसोबत होळी खेळली होती. असे म्हटले जाते की, शिवाचे हे विशेष भक्त जीवनातील रंगांपासून दूर राहतात. त्यामुळे भगवान शंकराने त्यांच्यासोबत स्मशानात पडलेल्या राखेने होळीचा सण साजरा केला होता.