India Maritime Sector : देशाच्या आर्थिक, सामरिक प्रभावासाठी ‘मजबूत सागरी क्षमता’ निर्णायक : PM नरेंद मोदी

कोलकात्यात ‘दुनागिरी’, ‘संशोधक’, ‘अग्रय’ या तीन स्वदेशी युद्धनौका नौदलात दाखल
India maritime sector Narendra Modi speech
Published on
Updated on

कोलकाता : देशाच्या आर्थिक आणि सामरिक प्रभावासाठी ‘मजबूत सागरी क्षमता’ हाच निर्णायक घटक असतो. भारताला याची पूर्ण जाणीव असून देश त्यासाठी स्वतःला भक्कमपणे तयार करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

येथील श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरामध्ये स्वदेशी बनावटीच्या तीन युद्धनौका नौदलात समाविष्ट केल्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले की, संरक्षण क्षेत्रात भारताला आता केवळ खरेदीदार देश म्हणून राहायचे नाही आणि आपली सशस्त्र दले जगासाठी केवळ एक बाजारपेठ बनू शकत नाहीत. आपल्या क्षमतेची खरी ओळख ही आपल्या स्वावलंबनात आहे, जगासाठी केवळ बाजारपेठ बनण्यात नाही, असेही ते म्हणाले.

कोणतेही राष्ट्र शक्तिशाली सागरी सामर्थ्याशिवाय महासत्ता बनू शकत नाही. देशाचा विकास, सुरक्षा आणि समृद्धी ही समुद्राशी जोडलेली आहे. सागरी क्षमता असलेला देश मजबूत असतो आणि त्याचा आर्थिक व सामरिक प्रभाव जगात अधिक असतो, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांच्या हस्ते ‘दुनागिरी’ ही स्टेल्थ फ्रिगेट, ‘संशोधक’ हे सर्वेक्षण जहाज व ‘अग्रय’ ही पाणबुडीविरोधी (अँटी सबमरीन) युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. हे फ्रंटलाइन प्लॅटफॉर्म्स सागरी युद्ध, हायड्रोग्राफिक सर्वेक्षण व पाणबुडीविरोधी युद्धातील भारताची वाढती ताकद दर्शवतात.

काही वर्षांपूर्वी ‘आयएनएस विक्रांत’ या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचा २०२२ मध्ये नौदलात समावेश करून भारताने आपल्या सागरी क्षमतेचे जगाला दर्शन घडवले होते, याची आठवण मोदींनी करून दिली. ते म्हणाले की, ‘आयएनएस विक्रांत’पासून आजपर्यंतचा भारताचा प्रवास हा केवळ नवीन युद्धनौकांपुरता मर्यादित नसून तो देशाच्या वाढत्या स्वावलंबनाचा प्रवास आहे. ‘आयएनएस अग्रय’, ‘दुनागिरी’ आणि ‘संशोधक’ यांच्या समावेशामुळे या प्रवासाला आता अधिक गती मिळत आहे.

या तिन्ही नौकांची रचना आणि बांधणी भारतातच झाली असून त्या देशातील अभियंते आणि कामगारांच्या प्रतिभेचे उत्तम उदाहरण आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारत वेगाने खरेदीदार देशाकडून निर्माता देश म्हणून स्वतःला प्रस्थापित करत असल्याचे सांगत, ज्या दिवशी आपण पूर्णपणे निर्माते बनू, त्या दिवशी आपण जगाचे निर्णय घेणारे बनू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांत ४० हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या असून ४५ मोठ्या नौकांचे बांधकाम सध्या सुरू असल्याची माहिती मोदींनी दिली. हे केवळ आकडे नसून, ती भारताच्या औद्योगिक क्षमतेची आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष असल्याचे ते म्हणाले.

या दिमाखदार सोहळ्याला पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news