

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याबाहेरही अनेक मराठीजन राहतात, त्यांचेही मराठी साहित्यात उल्लेखनीय योगदान आहे आहे. या मराठी भाषिकांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे, असा सूर साहित्य संमेलनात झालेल्या "बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन व साहित्य" या परिसंवादामध्ये उमटला.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात "बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन व साहित्य" परिसंवादामध्ये बंगळुरू येथील साहित्यिक डॉ. अनुराग लवेकर, अर्चना मीरजकर आणि पत्रकार मयुरेश वाटवे यांनी महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांचे कर्तृत्व आणि साहित्यावर उमटलेला ठसा यावर भाष्य केले. यावेळी महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधवांना, साहित्यिकांना ज्या ज्या अडचणी येतात त्यावरही परिसंवादातील वक्ते बोलते झाले.
डॉ. अनुराग लवेकर यांनी कर्नाटकासह दक्षिण भारतातील साहित्यिकांच्या योगदानाचा उल्लेख केला. कर्नाटकातील मराठी संस्थानांचा उल्लेख करताना महाराष्ट्रातील सामाजिक बदलांचे पडसाद दक्षिणेतील मराठी कुटुंबांवर पडले नसल्याचे ते म्हणाले. तसेच मराठी साहित्य सर्व भाषेत अनुवादित होणे गरजेचे आहे, विशेषतः इंग्रजीत होणे आवश्यक आहे. कर्नाटक मराठी साहित्य परिषदेला पदर मोडून पैसे खर्च करावे लागतात, राजकीय पुढाऱ्यांनी याकडे लक्ष दिले तर हे प्रश्न सुटू शकतील. अनेकदा सीमावर्ती भागात बसेस फोडल्या जातात किंवा अन्य काही गोष्टी केल्या जातात. या गोष्टीचे सामान्य माणसाच्या जीवनात स्थान नाही. कोणाचा तरी काही हेतू यामागे असतो. त्यात सामान्य माणूस भरडला जातो, असेही ते म्हणाले.
याच परिसंवादात बोलताना गोव्यातील पत्रकार मयुरेश वाटवे यांनी गोवा आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक स्थळांचा उल्लेख केला. गोव्यात उद्ध्वस्त झालेला निसर्ग आपल्याला साहित्यातून दिसतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गोव्याचे पर्यटन आणि माध्यमांमधील चित्रीकरणामुळे गोव्याबद्दल एक वेगळा समज तयार होऊ लागला आहे, असेही ते म्हणाले. तर अर्चना मीरजकर यांनी बृहन्महाराष्ट्रात मराठी संस्कृती जपण्याचे आणि आपली भाषा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या आव्हानाकडे लक्ष वेधले. प्रत्येकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहनही केले.