

वसंत भोसले
मुंगेर : बिहार राज्याच्या पोलिस प्रशासकीय यंत्रणेमध्ये दबंग पोलिस अधिकारी म्हणून नावारूपास आलेले महाराष्ट्रातील अकोल्याचे मराठी सुपुत्र शिवदीप लांडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन मतदारसंघांतून उतरले आहेत. एका मतदारसंघात आज (मंगळवारी) मतदान होत आहे.
अकोल्याचा जन्म आणि शेगाव येथील अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर भारतीय पोलिस सेवेमध्ये 2006 च्या बॅचचे अधिकारी असलेले शिवदीप लांडे बिहार केडरमध्ये होते. त्यांची पोलिस अधीक्षक म्हणून पहिलीच नियुक्ती मुंगेरला झाली होती आणि त्याच मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर विधानसभा मतदारसंघातून आणि शेजारच्या अररिया जिल्ह्यातील अररिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी भारतीय पोलिस सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी हिंद सेना नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला. मात्र, या पक्षाला निवडणूक आयोगाने अद्याप मान्यता दिलेली नाही. परिणामी, बिहारच्या राजकारणामध्ये सुमारे सत्तर जागा लढवण्याची त्यांची तयारी होती.
महाराष्ट्रातील राजकारणाशी तुलना करण्यासारखी परिस्थिती येथे नाही असे सांगून ते म्हणाले की, माझा पक्ष (हिंद सेना) नोंदणीकृत झाला असता, तर आम्हाला एक समान चिन्ह मिळाले असते. त्याच्या आधारे किमान सत्तर विधानसभा मतदारसंघांतून आम्ही उमेदवार उभे करण्याची तयारी केली होती; पण निवडणूक आयोगाने आम्हाला नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता दिली नाही. अद्याप तो प्रस्ताव आयोगाकडे पडून आहे. आमच्या नंतर काही राजकीय गटांनी पक्षाची नोंदणी करण्यास प्रस्ताव दिले. त्यांना नोंदणी देण्यात आली हा राजकारणाचाच भाग आहे. कारण, सर्वत्र माझ्या पक्षातर्फे उमेदवार उभे राहिले असते, तर त्याचा मोठा फटका येथील प्रस्थापित राजकीय पक्षांना बसू शकला असता.