प्रेम, संवाद, सहवास, सहनशीलतेमुळे मराठीचा अमराठीशी सुखाने संसार !

Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनातील परिसंवादाचा सूर
प्रेम, संवाद, सहवास, सहनशीलतेमुळे मराठीचा अमराठीशी सुखाने संसार !
Published on
Updated on

नवी दिल्ली : प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित 'मनमोकळा संवाद - मराठीचा अमराठी संसार' या परिसंवादातून निघाला.

दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी "मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार" या विषयावरील परिसंवादात माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. साधना शंकर, रेखा रायकर आणि मनोज कुमार, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष, गायिका उद्योजक डॉ. मंजिरी वैद्य आणि प्रसन्न अय्यर या मान्यवरांनी सहभाग घेतला. विशेष पाहुणे म्हणून आमदार डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.

परिसंवादादरम्यान मराठी-अमराठी संसारातील संवाद, संस्कृतीतील भिन्नता, कौटुंबिक नातेसंबंधांवरील परिणाम आणि मुलांच्या भाषिक जडणघडणीसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली. भाषेमुळे एकमेकांशी संवाद होत असतो त्यामुळे अधिक व्याकरणात न पडता अधिकाधिक लोकांनी संवाद आपल्या आपल्या मातृभाषेत साधला पाहिजे असे एक मत या परिसंवादात व्यक्त झाले.

परिसंवादात सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांनी वैवाहिक जीवनातील भाषिक गमतीजमती उलगडल्या, तर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी विविध भाषांमधील संवादाने समजुतीला कसा हातभार लावला याची माहिती दिली. मनोज कुमार यांनी आपणास मराठी पूर्णपणे समजत असून मराठी सिनेमा आणि नाटकाचे चाहते असल्याचे त्यांनी सांगितले. सागरिका घोष मराठीतले काही शब्द हिंदीत वेगळा अर्थ निघतो मूळ अर्थ कळल्यावर आलेले हसू रोखता आले नाही असा अनुभव सांगितला.

डॉ. साधना शंकर सासुबाईंसोबत भाषेतून आणि भावनेतून झालेला संवाद एकमेकांसाठी पुरेसा होता. मराठी येत नसल्यामुळे सासुबाई मनसोक्त व्यक्त व्हायच्या, ही आठवण त्यांनी ताजी केली. डॉ. मंजिरी वैद्य तमिळ कुटुंबात गेल्यावर पाल या शब्दाला दूध असे म्हटल्याने निर्माण झालेल्या गमतीचा अनुभव त्यांनी सर्वांसमोर मांडला. सासरचे कुटुंब मोठे सर्वांनी सांभाळून घेतल्याचे रेखा रायकर यांनी सांगितले. परिसंवादाच्या शेवटी भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो, असा सकारात्मक सूर उमटला.

या कार्यक्रमात पत्रकार राजदीप सरदेसाई यांना त्यांच्या पत्नी सागरिका घोष यांनी विचारले की तुम्ही कधी म्हणता महाराष्ट्राचा आहे, कधी म्हणता गोवा तर कधी गुजरातचा आहे म्हणता. आज सांगा की तुम्ही नेमके कुठले आहेत. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, मी पश्चिम भारतीय आहे. ही तिन्ही राज्य पश्चिम भारतात येतात. महाराष्ट्र मोठा भाऊ आहे, गोवा छोटा आहे. आजच्या तारखेत गुजरातविषयी जेवढे कमी बोलले तेवढे चांगले असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news