

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी येथे गेले तीन दिवस सुरु असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचा आज समारोप झााला . संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार करून या संमेलनाचा समारोप करण्यात आला. समारोपप्रसंगी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी आपले विचार मांडले.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून आजपर्यंत सर्व घटकांमधील व्यक्ती मला भेटले आणि शुभेच्छा देऊन गेले. यामध्ये गावातील सामान्य नागरिकांपासून ते अगदी कुलगुरू आणि अनेक मान्यवर होते. यामध्ये मी व्यक्ती म्हणून नगण्य आहे मात्र अध्यक्ष म्हणून आणि मराठी भाषेमुळे, साहित्यामुळे हे सगळं महत्त्व आहे, मी केवळ नाममात्र आहे, अशा भावना ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केल्या. समारोपिय कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
डॉ. तारा भवाळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वात शेवटी भाषण केले. कार्यक्रमाला उशीर झाला होता. यावर मिश्किल टिप्पणी करत म्हणाल्या की, एखाद्याचा सात्विक सूड घ्यायचा असेल तर त्याला लांबलेल्या कार्यक्रमात शेवटी बोलायला दिले जाते, यानिमित्ताने मला हे नक्की माहिती आहे की, मंचावर उपस्थित असलेले आणि समोर असलेले सात्विक आहेत, असे प्रतिपादन डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
पुढे त्या म्हणाल्या की, अजित पवारांनी मला ताराक्का म्हटले. मला घरी ताराक्का म्हणतात हे त्यांना कसे कळाले हे माहिती नाही. मात्र आता उतार वयात हात धरायला एक भाऊ मिळाला याचा आनंद आहे.
शिक्षणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मराठी भाषा प्राथमिक स्तरावर नीट वापरली जावी. शिक्षकांच्या नेमणुका वेळेवर झाल्या पाहिजेत. त्यांना आवश्यक अनुदान दिले पाहिजे, त्यांचे पगार वेळेवर झाले पाहिजेत. मी स्वतः प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत शिकवले आहे. या सर्व स्तरात मराठीची निगा राखली गेली तरच मराठीला आणखी महत्त्व येणार आहे. पालकांनी मुलांना मराठी शाळेत घातले पाहिजे असे वाटत असेल तर त्यांना चांगल्या इमारती, चांगले शिक्षक, चांगल्या सुविधा द्या आणि त्यासाठी आर्थिक तरतूद करा अशा सूचना दिल्या.
यावेळी सांगलीतील त्यांच्या घरासमोरील शाळेचे उदाहरण देताना तारा भवाळकर म्हणाल्या की, ५५ वर्ष सुरू असलेली शाळा विकायला काढली जाते त्यामुळे केवळ ठराव पास करून चालणार नाहीत, प्रत्येकाने प्रयत्न केले तर भाषा टिकेल. आपल्या सगळ्यांनी प्रयत्न केले तर संस्कृती टिकेल आणि भाषा ही संस्कृतीची वाहक असते. मंत्री उदय सामंत यांनी अनेक गोष्टींच्या तरतुदी केल्याचे सांगितले मात्र त्या प्रत्यक्ष अमंलात आणल्यास मला जास्त आनंद होईल, असेही त्या म्हणाल्या.
साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी जे ठराव पारित करण्यात आले त्याबाबत बोलताना तारा भवाळकर म्हणाले की, सर्वच ठरावांचा माझा जवळचा संबंध आहे. महाराष्ट्र- गोवा, महाराष्ट्र- कर्नाटक सीमेच्या मी जवळ राहते. त्यांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न या ठरावांमधून करण्यात आला आहे. गोव्यात कोकणी आणि मराठी जो वाद आहे त्याची मी साक्षी आहे. सीमाभागावर द्वैभाषिक शाळा चालल्या पाहिजेत, काही शाळा आहेत मात्र त्यांची संख्या कमी होत आहे, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातील मुलांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले पाहिजे. अनेक शाळांमध्ये जे मराठी शिकवले जाते ते दुय्यम मराठी शिकवले जाते, प्रगत आणि उच्च दर्जाचे मराठी शिकवले पाहिजे. आपल्या शाळांमध्ये परदेशी भाषा जितक्या आस्थेने शिकवल्या जातात तितकी मराठी भाषा आस्थेने शिकवली गेली पाहिजे. तसेच आपल्या राज्यात इतर देशांमधील भाषा शिकवल्या जातात मात्र इतर राज्यांमधीलच भाषा शिकवल्या जात नाही, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. निमंत्रक म्हणूज संजय नहार यांनी चांगली काळजी घेतली असे सांगतानाच पंतप्रधान मोदींनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
तारा भवाळकर शेवटी म्हणाल्या की, सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. केवळ अध्यासन स्थापन करून, मराठी बोला म्हणून मराठी वाढणार नाही तर सर्वांच्या घराची, मनाची भाषा मराठी असली पाहिजे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी भाषा अध्यासन सुरू होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यावेळी यापूर्वीही दिल्लीत जेएनयुसह अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी येण्याचा योग आल्याचे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात पुस्तकांचे गाव आहेत. पुस्तकांचे गाव आहे, कवितांचे गाव आहे, कादंबरीचे गाव आहे मात्र मराठीचा भाव त्यामध्ये असला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटनीय कार्यक्रमाच्या दिवशी तारा भवाळकर मंचावर येत असताना पायऱ्या चढताना त्रास होत होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारा भवाळकर यांचा हात हातात घेऊन त्यांना मंचावर आणले. त्यांच्या या कृतीची आठवण ठेवत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आज मिलिंद जोशी यांनी पार पाडल्याचे सांगितले.