

नवी दिल्ली : मराठा सेवा संघाचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आधारित असून ते ‘शिवशाही’चे आधुनिक स्वरूप आहे, विजय नवल पाटील यांनी असे प्रतिपादन केले. मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने दिल्लीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. हे शिबिर संघटनेचा आत्मा आहे आणि कार्यकर्त्यांना समाज व राष्ट्रासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रेरणा देते, असे ते म्हणाले.
शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव प्रदीप पाटील होते. उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर राष्ट्रीय किसान नेते अविनाश काकडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, मराठा समन्वय कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, मराठा न्यायदान कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश काकडे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. संभाजी नवघरे, संत गाडगे महाराज प्रबोधन कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराजे पाटील आणि दिल्ली मराठा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती अंजली पाटील यांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमती संयुक्ता देशमुख यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘एआय’चा वापर केला असता
अविनाश काकडे म्हणाले की, मराठा समाज हा केवळ एक जात नाही, तर विविध जाती-जमातींचा समन्वय आहे. जर आज शिवाजी महाराज असते, तर त्यांनी आपल्याला घोडा-तलवारीऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करण्याची प्रेरणा दिली असती.