वारकरी संप्रदायाचं बोट धरून अनेक जण पुढे गेले…

Published on
Updated on

वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायातील संतांचं तत्त्वज्ञान, त्यांचं साहित्य याचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत कशाप्रकारे उपयोग झाला, याचा विचार आपण केला पाहिजे. तर, महात्मा जोेतिराव फुले यांच्या प्रभावळीमध्ये कृष्णराव पांडुरंग भालेकर होते. त्यांनी 'दीनबंधू' नावाचं वर्तमानपत्र काढलं. ते मुख्य प्रवाहाच्या बाहेरचं बहुजन समाजातल्या व्यक्तीनं काढलेलं पहिलं वर्तमानपत्र… त्यादृष्टीनं आपण त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. कारण, त्या वेळेला याची गरज यासाठी भासली की, तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी महात्मा फुले यांच्यावर आणि सत्यशोधक समाजावर एक टीकास्त्र सोडलं होतं. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी आणि मुकाबला करण्यासाठी आपल्यालासुद्धा एक वर्तमानपत्र हवं होतं. चिपळूणकरांची निबंधमाला महिन्यातून एकदाच प्रकाशित व्हायची. त्यामुळे आपण अशाच प्रकारचं वर्तमानपत्र काढू, असं भालेकरांना वाटलं. त्यातून दीनबंधू वर्तमानपत्राची सुरुवात झाली. ही मंडळी ज्या वेळेला उपदेश करायची तेव्हा संतांच्या वचनांचा आधार घ्यायची.

'दीनबंधू' काही काळ चाललं… त्यानंतर भालेकरांना ते सोडून द्यावं लागलं… मग दुसरं कोणीतरी हे वर्तमानपत्र चालवलं. तो वेगळा इतिहास आहे; पण भालेकरांच्या पश्चात त्यांची वृत्तपत्रकाराची परंपरा आणि पत्रकारितेची परंपरा त्यांचे चिरंजीव मुकुंदराव पाटील यांनी चालू ठेवली. त्यांनी नगर जिल्ह्यातील एक 'दीनमित्र' नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. कित्येक वर्षं आणि दशकं वर्तमानपत्र चालवलं. ही सगळी वर्तमानपत्रं जी चालायची ती बहुजन समाजासाठी होती. बहुजन समाजावर संतांचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. कारण, तोपर्यंत इंग्रजी विद्या जी होती ती लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याकडे होती. ती बहुजन समाजापर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे त्यांना वर्तमानपत्रातून जे सांगायचं होतं ते या माध्यमातूनच सांगायचं होतं. ते बहुजन समाजाच्या भाषेतच सांगावं लागे. कारण, ही मंडळी ग्रामीण भागातली आणि बहुजन समाजातली. ती मराठी बोलायची जी संतांनी घडवलेली मराठी आहे. आधुनिक लोक जी मराठी बोलतात, ती मुळात संतांनी घडवलेली असली, तरी इंग्रजी भाषेचाच तिच्यावर प्रभाव आहे. चिपळूणकरांनी निबंधमालेत एक वेगळ्याच प्रकारची मराठी घडवली. तिचा जो प्रभाव आहे, तो ग्रामीण भागातील लोकांवर नव्हता. त्यामुळे अस्सल मराठी बाज या लोकांच्या वर्तमानपत्रातून दिसून आला. ही सगळी ब्राह्मणेतरांची वृत्तपत्रसृष्टी.सत्यशोधकांची ती याप्रकारे संतांच्या, वारकर्‍यांच्या भाषेमध्ये पुढे विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळेल. ज्याला आपण धर्माची सुधारणा करायला हवी, असे म्हणतो आणि त्यासाठी काहीतरी नवीन धर्म स्थापन केला पाहिजे, असे आपण म्हणतो. त्या मूळ हिंदू धर्मामध्ये काही दुष्ट प्रथा होत्या. काही अमानवी गोष्टी होत्या. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्यता. त्यामुळे सर्व 

नवधर्मसुधारकांचा रोख निश्चितपणे ती कमी करण्याकडे होता. म्हणूनच, साहजिकच काही काळानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कार्यरत झाल्यानंतर त्यांनी अस्पृश्यांची स्वतंत्र चळवळ उभी केली; पण त्यापूर्वी अस्पृश्यांच्या मागे प्रार्थना समाजाची मंडळी उभी राहिली. ती सत्यशोधक समाजाची मंडळी आहेत.

महात्मा फुले यांनी तर त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढली होती. त्यांनी आपल्या घरात शाळा चालवली होती. आपला पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला केला होता. त्यांचे वडील गोविंदराव फुले यांना हे पटायचं नाही. कारण, ते जुन्या विचारांचे होते. तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंना घराबाहेर काढलं. वडिलांच्या प्रेमापोटी आपली तात्त्विक भूमिका सोडून द्यायची, हे ते करू शकले असते; पण त्यांनी तसं न करता आपल्या तात्त्विक भूमिकेप्रमाणे व्यवहार करण्यासाठी कुटुंबाचा त्याग केला. वडिलांचं न ऐकता ते घराच्या बाहेर पडले.

त्या काळामध्ये अस्पृश्य मंडळींसाठी हे लोक कार्य करायचे. प्रार्थना समाजाच्या लोकांनी मनावर घेतलं. विशेषतः न्यायमूर्ती चंदावरकर यांनी आणि त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना मदत केली. त्यानंतर शिंदेंनी निराश्रित साहाय्यकारी समाज ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेअंतर्गत पुण्यात अहिल्याश्रम नावाची शाळा आणि वसतिगृह चालवलं. तिथं सर्व अस्पृश्यांच्या मुला-मुलींना ते आणायचे, त्यांचं शिक्षण करायचं, त्यांचं खाणंपिणं आणि आरोग्याची काळजी घ्यायचे. हे बराच काळ चाललं. शिंदेंच्या संस्थेच्या अनेक शाखा निघाल्या होत्या. शिंदेंना अस्पृश्यांचा उद्धार करण्याची प्रेरणा कुठून मिळाली अन् हे करताना सर्वण भावबंधांचा रोष ओढवून घेण्याची… त्यांना तर बहिष्कृत केलं होतं त्यांच्या नातेवाइकांनी. शिंदेंना विचारण्यात आलं की, तुम्हाला ही प्रेरणा कुठून आली? तर त्यांनी सांगितलं की, माझ्या घरी वारकरी संप्रदाय आहे आणि अस्पृश्यता निवारणाची प्रेरणा मी वारकरी संप्रदायातून घेतलेली आहे. मग, प्रार्थना समाजाचे विठ्ठल रामजी शिंदे हे डॉ. आर. जी. भांडारकर यांच्याप्रमाणेच कीर्तन करायचे आणि कीर्तनातून धर्माची सुधारणा झाली पाहिजे, सामाजिक सुधारणा झाली पाहिजे, पारंपरिक रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत त्याचा त्याग केला पाहिजे, असा उपदेश ते करायचे. ही जी परंपरा पारंपरिकतेतून आधुनिकतेकडे जाणारी परंपरा ही वारकरी संप्रदायाच्या आधारे त्यांना नव्यानं निर्माण करणं शक्य झालं. पुढे हा सिलसिला बराच काळ चालला. विठ्ठल रामजी शिंदे याचंही नाव या क्षेत्रामध्ये झालं. दरम्यानच्या काळात अस्पृश्य समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा हिरा मिळाला. डॉ. आंबेडकर परदेशी गेले. त्यांना सयाजीराव गायकवाड यांनी आणि नंतरच्या काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली. प्रार्थना समाजातले लोक बर्‍यापैकी उच्चभ्रूच होते.

सत्यशोधक समाजातले लोक इतके उच्चभ्रू नसले, तरी ते बहुजन समाजातले होते. परंतु; हे सर्वजण सवर्ण होते.

अस्पृश्यांचा आणि बहिष्कृतांचा प्रश्न वेगळा आहे आणि तो सवर्ण मंडळी सोडवू शकत नाहीत, याची डॉ. आंबेडकर यांना कल्पना आली म्हणून त्यांनी स्वतंत्र अशी संस्था उभारली. ती उभारताना त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली. आपण चळवळ करायची झाली, तर आपल्याला स्वतंत्र वर्तमानपत्र पाहिजे, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणून त्यांनी 1920 साली 'मूकनायक' वर्तमानपत्र सुरू केलं. त्यातून ते अस्पृश्यांच्या प्रश्नांची मांडणी करायला लागले. त्यांचे हक्क जे काय असतील आणि ते काय हवेत, त्याची मागणी करू लागले. तर मांडणी आणि मागणी, अशा पद्धतीचं ते वर्तमानपत्र होतं. मूकनायक हा शब्द बघा, त्यामागची प्रेरणा बघा. मूकनायक वर्तमानपत्राच्या शीर्षस्थानी प्रत्येक अंकात तुकाराम महाराजांचा एक अभंग असायचा. ते ब्रीदवाक्य होतं 'मूकनायक'चं. डॉ. आंबेडकरांनी लहानपणी संतसाहित्याचा खूप चांगला अभ्यास केला होता. तसा महात्मा फुलेंनीही केला होता. खासकरून तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा अभ्यास त्यांनी केला. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला जर काही हवं असेल तर लोकांना कळणार कसं? जो गप्प राहतो, जो मूक राहतो, त्याचं कुणीही नसतं.

'नव्हे जगी कोण मुकियाचा जाण, सार्थक लाजोनी नव्हे हित.. काय करून आता धरूनिया भीड, निःशक हे तोड वाजविले…'

हा अभंग 'मूकनायक'च्या प्रत्येक अंकात त्यांचं ब्रीदवाक्य म्हणून पुढे आलं. डॉ. आंबेडकर बर्‍याच वेळेला जातिभेद कसं चुकीचं आहे, हे सांगताना संतांच्या वचनाचा आधार द्यायचे. त्या वेळेला काळ खूप पुढे गेला. संतांच्या काळात वारकरी संप्रदाय जितका पुरोगामी होता, त्यापेक्षा अधिक पुरोगामी होण्याची गरज पुढील काळात निर्माण झाली. परंतु; हे आधुनिकतेचं वारं कीर्तनकार, वारकर्‍यांकडे पोहोचलं नाही. त्याच्यामुळे ते जुन्याच पठडीत राहिलं. प्रार्थना समाजाच्या आणि सत्यशोधक समाजातील लोकांनी संतसाहित्याचा उपयोग करून घेतला की, जो वारकर्‍यांच्या पुढार्‍यांंंंना करता येत नव्हता. त्यांची एकप्रकारची वैचारिक कोंडी झाली होती; पण एरवीसुद्धा वारकरी संप्रदायानं अस्पृश्य मंडळींना स्थान दिलं होतं. संतांच्या पालख्यांबरोबर अस्पृश्य वारकर्‍यांच्या दिंड्या असायच्या; पण 20व्या शतकातल्या लोकांच्या आकांक्षा ज्याप्रमाणे वाढल्या, त्यांना हक्काची जाणीव झाली, त्या जाणिवेशी आणि आकांक्षांशी, त्या मागण्यांशी जुळवून घेण्याची क्षमता त्या वेळच्या वारकरी संप्रदायाच्या धोरणामध्ये नव्हती. नेमकं या संतांच्या अभंगांच्या आणि वाड्.मयाच्या आधारे हे समाज त्यांची मागणी करीत होते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अस्पृश्य समाजाला काही प्रमाणात स्थान होतं; जे पुरेसं नव्हतं. जेवढं शक्य झालं तेवढं सामावून घेण्याचा प्रयत्न वारकर्‍यांनी निश्चित केलेला आहे. अस्पृश्य समाजामध्ये कीर्तनकार होते. त्यांच्या घरामध्ये पोथ्या असायच्या. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा असे ग्रंथ असायचे. ही एक परंपरा विद्वत्तेची त्यांच्यात होती. ती एक पार्श्वभूमी तयार होतीच. म्हणून महाडचा सत्याग्रह करताना डॉ. आंबेडकर जेव्हा गेले तेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी भजन आणि कीर्तनं केली जात. त्या मंडळींत कीर्तनकारसुद्धा होते. तेव्हा त्यांचा जास्तीत जास्त वापर केला गेला.

एकूणच इतिहासाचा अभ्यास करताना असं दिसतं की, वारकरी संप्रदाय हा पारंपरिक चुकीच्या धर्मश्रद्धा, अंधश्रद्धा, जातिभेदासारख्या रूढी यांची समीक्षा करणारा आणि त्यांना नाकारणारा एक संप्रदाय होता. त्यामुळे यातील प्रभाव ओळखून आपला समाज पुढे जाण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, याचा विचार या सर्व मंडळींनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यांनी दुसरं वर्तमानपत्र काढलं 'बहिष्कृत भारत' नावाचं… मधल्या काळात 'मूकनायक' बंद झालं. त्या 'बहिष्कृत भारत'चं ब्रीदवाक्य हे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीतून आलेलं होतं. हे संतांचं साहित्य लोकांच्या जगण्यात उतरलेलं होतं…

डॉ. सदानंद मोरे 

(लेखक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news