

पुढारी ऑनलाईन डेस्क : हत्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपीने जामीनावर सुटल्यानंतर संबंधित महिलेच्या पतीसह सासूचीही हत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमधील पलक्कड जिल्ह्यात घडली आहे. दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी चेंथामारा फरार होता. अखेर पोलिसांनी पोथुंडीच्या मटाई वन परिसरात त्याला अटक केली.
पलक्कड जिल्ह्यातील नेनमारा गवात चेंथामारा हा सुधाकरनच्या घराजवळच राहत होता. सुधाकरनचे कुटुंब जादूटोणा करते. त्यामुळेच पत्नी सोडून गेली, असा संशय चेंथामाराला होता. मात्र चेंथामारा यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून त्याची पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली होती, असे ग्रामस्थांसह सुधाकरनही मानत होता. आपल्याला पत्नी सुधाकरन याच्या कुटुंबामुळेच सोडून गेली या संशयातूनच त्याने २०१९ मध्ये सुधाकरन यांची पत्नी साजिता हिचा खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला शिक्षाही झाली मात्र काही दिवसांपूर्वीच त्याची जामीनावर सुटका झाली होती.
सुधाकरन आपल्या पत्नीचा खुनाचा बदला घेण्यासाठी आपली हत्या करेल, असा संशय चेंथामाराला होता. या संशयातून त्याने सोमवारी ( दि. २७ जानेवारी) सुधाकरन आणि त्याची आई लक्ष्मी यांची घरात हत्या केली. पोलिसांनी त्याला पोथुंडीच्या मटाई वन परिसरात अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली आहे. सुधाकरन पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्यावर हल्ला करेल, अशी भीती होती म्हणून त्याच्यासह त्याच्या आईची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. आपल्या पत्नीचाही खून करण्याचा कट त्याने रचला होता, अशी धक्कादायक माहितीही पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पलक्कडचे पोलिस अधीक्षक अजित कुमार यांनी दिली असल्याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
या प्रकरणी पोलिसांर्चंया निष्क्रियतेमुळेच आपल्या घरातील तिघांचा खून झाल्याचा आरोप सुधाकरन यांच्या मुलीने केला आहे. चेंथामारा याच्याविरोधात २९ डिसेंबर २०२४ रोजी पोलिांकडे तक्रार केली होती. तसेच त्याला परिसरात येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी सुधाकरन यांच्या मुलीसह ग्रामस्थांनी केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे तिने म्हटले आहे. ग्रामस्थांनीही पोलिसांच्या उदासीन भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. पोलिस ठाण्याबाहेर ग्रामस्थांनी निदर्शने करत आपला रोष व्यक्त केला.