नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी "मन की बात" द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. हा कार्यक्रम केवळ रेडिओवर प्रसारित केला जातो. आज (दि.२९ सप्टेंबर) रविवारी या कार्यक्रमाचा 114 वा एपिसोड होता. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यांचे विचार लोकांसोबत शेअर केले.
आज २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी "मन की बात" कार्यक्रमात सांगितले की, हा भाग त्यांच्यासाठी भावनिक होता. त्यानी सांगितले की हा एपिसोड त्यांच्या जुन्या आठवणींनी घेरला आहे. पंतप्रधान मोदी गेल्या 10 वर्षांपासून या कार्यक्रमाद्वारे जनतेशी जोडले गेले आहेत, आणि ते लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. 'मन की बात' ऐकणारे हेच या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, मसालेदार आणि नकारात्मक चर्चा असल्याशिवाय कार्यक्रमाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा सामान्यतः एक समज निर्माण झाला आहे. ते म्हणाले, “पण मन की बातने हे सिद्ध केले आहे की, देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी किती भुकेले आहेत. लोकांना सकारात्मक शब्द आणि प्रेरणादायी उदाहरणे आवडतात.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. पुन्हा एकदा 'मन की बात'मध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आजचा भाग मला भावूक करत आहे. कारण आम्ही 'मन की बात'चा 10 वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहोत. पुढे त्यांनी सांगितले की, "10 वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबरला विजयादशमीला "मन की बात" सुरू झाली. यावर्षीही 3 ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे, जो पवित्र योगायोग आहे.
'मन की बात' कार्यक्रमाशी संबंधित पत्रे वाचून त्यांना अभिमान वाटतो की देशात किती प्रतिभावान लोक आहेत आणि त्यांच्यात देश आणि समाजाची सेवा करण्याची किती तळमळ आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले, "'मन की बात'ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी मंदिरात जाऊन देव पाहण्यासारखी आहे." . आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, 'एक पेड माँ के नाम' आणि स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले.
3 ऑक्टोबर 2014 रोजी "मन की बात" हा कार्यक्रम सुरू झाला. तेव्हापासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतात. हा कार्यक्रम 22 भारतीय भाषा आणि 29 बोली तसेच 11 परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो. यामध्ये फ्रेंच, चायनीज, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मीज, बलोची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यांचा समावेश आहे. अशा प्रकारे, “मन की बात” हा कार्यक्रम एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे, जिथे पंतप्रधान मोदी थेट जनतेशी संपर्क साधतात आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा करतात.