

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने लागू केलेला वक्फ कायद्या विषयी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही या कायद्याला पाठिंबा देत नाही. हा कायदा आमच्या राज्यात लागू केला जाणार नाही, असा आज (दि. १२) पुनरुच्चार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म Xवर पोस्ट करत केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन शांततेचे आवाहन केले. यानंतर Xवर केलेल्या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, " पश्चिम बंगाल राज्यातील सर्व धर्माच्या लोकांना माझे प्रामाणिक आवाहन आहे की, कृपया शांत राहा, संयम ठेवा. धर्माच्या नावाखाली कोणत्याही बेकायदेशीर वर्तनात सहभागी होऊ नका. प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे. राजकारणासाठी दंगली भडकावू नका. दंगली भडकवणारे समाजाचे नुकसान करत आहेत."
मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनी हिंसक वळण लागले. निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात १५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अफवांमुळे शुक्रवारी हिंसक निदर्शने झाली, ज्यामध्ये अनेक सरकारी वाहने, पोलिस चौक्या, रेल्वे कार्यालये आणि दुकानांसह इमारतींची तोडफोड आणि आग लावण्यात आली, असे बंगालचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव कुमार यांनी स्पष्ट केले होते.