
नवी दिल्ली : हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातील पराभवामुळे इंडिया आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज होऊ लागले आहेत. तृणमूल काँग्रेसने तर इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचा थेट दावा केला आहे.
समाजवादी पक्षानेही तृणमूलच्या या दाव्याचे समर्थन केले आहे. दुसरीकडे ‘सपा’ने महाराष्ट्रात महाविकास आघाडीपासून वेगळे होण्याची घोषणाही केली आहे. तर तृणमूलच्या दाव्यामुळे काँग्रेस संतप्त झाली आहे. आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून नेतृत्व काँग्रेसकडे असणे स्वाभाविक असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
सलग दोन विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर लगेचच इंडिया आघाडीतील संघर्ष सुरु झाला आहे. सर्व पक्षांचे वेगळेवेगळे सूर पाहायला मिळत आहेत. काँग्रेस मित्रपक्षांच्या निशाण्यावर आहे. सर्वप्रथम तृणमूलने काँग्रेस विरोधी भूमिका घेतली आहे. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जींना आघाडीचे नेतृत्व द्यावे असे म्हटले. यानंतर तृणमूलच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः हा मुद्दा उपस्थित करत थेट काँग्रेस नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.
त्या म्हणाल्या की, या पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूलने सिद्ध केले आहे की, समोर कितीही मोठा राजकीय पक्ष असला तरी त्याला पराभूत करण्याची क्षमता फक्त आमच्या पक्षात आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या ६ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व जागा जिंकून तृणमूलने स्वतः सिद्ध केले. तर महाराष्ट्रातील इंडिया आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती. विशेषत: प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा आणि आघाडीचे नेतृत्व करणारा काँग्रेस पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. भाजपसमोर काँग्रेस कुठेही टिकू शकत नाही, असे मत इंडिया आघाडीतील पक्षांचे होत आहे. अशा स्थितीत आघाडीच्या मित्रपक्षांना नेतृत्व बदलण्याची गरज वाटत आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनीच इंडिया आघाडीची निर्मिती केली. आता आघाडी चालवण्याची जबाबदारी सर्व पक्षांची आणि काँग्रेसची आहे.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तृणमूलने अदानीच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेतली होती. ‘सपा’नेही संसदेत काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, उत्तर प्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकही जागा दिली नव्हती. तरीही काँग्रेसने महाराष्ट्रात ‘सपा’ला दोन जागा दिल्या आणि उत्तर प्रदेशात पाठिंबा दिला.
Meta Keywords: , , Mamata Leadership Claim, Political Alliance, West Bengal CM, Indian Politics