

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी (दि.६) इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच संधी मिळाल्यास या आघाडीचे नेतृत्त्व करण्याचेही सूतोवाच त्यांनी केले होते. ममता बॅनर्जी यांचे समाजवादी पार्टीने समर्थन केले आहे. इंडिया आघाडीचे नेतृत्त्व ममता बॅनर्जी करणार असतील तर आमचे १०० टक्के समर्थन असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसने याला विरोध केला आहे.
शुक्रवारी (दि.६) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, "मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. इंडिया आघाडी ही देशातील भाजप विरोधी शक्ती म्हणून ओळखला जाते. मला संधी मिळघली तर मी इंडिया आघाडीचे कामकाज सुनिश्चित करेन. मला बंगालच्या बाहेर जायचे नाही, पण बंगालमधून इंडिया आघाडीचे नेतृत्त्व करणे."
तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांनी त्यांची इंडिया आघाडीच्याप्रमुख म्हणून ममता बॅनर्जी यांनची नियुक्ती करावी अशी मागणी केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते उदयवीर सिंग म्हणाले की, इंडिया आघाडीने ममता बॅनर्जी यांच्या सूचनेवर चर्चा केली पाहिजे. त्यांना 100% समर्थन आणि सहकार्य दिले पाहिजे. तर काँग्रसचे खासदार मणिकम टागोर यांनी,"एक चांगला विनोद:, असे म्हणत या मागणीची खिल्ली उडवली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात इंडिया आघाडीत कार्यपद्धतीवरून मोठे मतभेद निर्माण झाले. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनीही गौतम अदानी लाचखोरीप्रकरणी विरोधी पक्षांच्या संयुक्त विरोधाला वगळले. तृणमूलला महागाई, बेरोजगारी आणि विरोधी राज्यांना मिळणारा निधी वंचित ठेवण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, तर समाजवादी पक्षाच्या नेत्यांना संभल हिंसाचार चर्चा व्हावी, असे स्पष्ट करत या दोन्ही पक्षांनी काँग्रेसपासून फारकत घेतली होती.