

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला असतानाच, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. मतमोजणी केंद्रावर आपल्याला मारहाण करण्यात आली असून लोकशाहीला उघडपणे काळीमा फासण्याचे काम सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निकालांना त्यांनी 'नैतिक विजय' मानण्यास स्पष्ट नकार दिला असून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सोमवारी (दि. ४) संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘दुपारी तीन वाजेपासून आम्हाला मारहाण केली जात आहे. त्यांनी मला लाथ मारली आणि केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. आमच्या एकाही प्रतिनिधीला (एजंटला) आत प्रवेश दिला जात नाहीये. मी स्वतः अवघ्या पाच मिनिटांसाठी आत गेली होते आणि आमच्या एजंटला प्रवेश मिळावा अशी विनंती केली होती. मला आश्वासन देऊनही नंतर तिथे कोणीच उपलब्ध नव्हते. मी यासंदर्भात सर्व स्तरांवर तक्रारी केल्या आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, ‘भाजपने १०० हून अधिक जागांवर केंद्रीय बळाचा गैरवापर करून हा निकाल फिरवला आहे. त्यांचा हा विजय अनैतिक आहे. निवडणूक आयोग हा आता भाजपचा आयोग झाला असून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या सांगण्यावरून ही अवैध कृत्ये केली जात आहेत. ही केवळ लूट आहे, मात्र आम्ही पुन्हा जिद्दीने पुनरागमन करू,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या हक्काच्या भवानीपूर मतदारसंघातही त्यांना कडव्या लढतीचा सामना करावा लागला. मात्र, त्यांना त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी धूळ चारली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना स्वत:ची सीट निवडून आणण्यात अपयश आल्याने सर्वत्र त्यांच्या परभवाची चर्चा रंगली आहे.
भाजप विचारवंत श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या या गृहराज्यात भाजप प्रथमच सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भाजप २०४ जागांवर आघाडीवर असून त्यांनी ११७ जागा आधीच खिशात घातल्या आहेत. गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी थेट द्विशतकी मजल मारून तृणमूलच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. तृणमूल काँग्रेसला केवळ ८१ जागांवर समाधान मानावे लागत असून त्यांची पिछाडी स्पष्ट दिसत आहे.
मतदार यादीतील 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेवरून झालेला वाद आणि भाजपने दिलेली आश्वासने या निवडणुकीत गेमचेंजर ठरल्याचे बोलले जात आहे. बंगालच्या राजकारणात काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या वर्चस्वानंतर आता 'भगवा' पर्व सुरू होण्याचे स्पष्ट संकेत या निकालांतून मिळत आहेत.