Malegaon Court Verdict | बलात्कार करून बालिकेची हत्या; नराधमाला फाशीची शिक्षा

मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Malegaon Court Verdict |
Malegaon Court Verdict | बलात्कार करून बालिकेची हत्या; नराधमाला फाशीची शिक्षा
Published on: 
Updated on: 

मालेगाव : अवघ्‍या चारवर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणार्‍या विजय ऊर्फ शेखर संजय खैरनार (२४) या नराधमाला मालेगाव (जि. नाशिक) येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे गेल्‍या वर्षी नोव्‍हेंबर महिन्‍यात घडली होती.

याच प्रकरणात न्‍यायालयाने आरोपीला अपहरण व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षाही ठोठावली. आरोपीला निकालाविरुद्ध ३० दिवसांत उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मुभा असेल. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी २०४ पानी निकालाचे वाचन करून हा निर्णय जाहीर केला.

उज्ज्वल निकम यांचा प्रभावी युक्तिवाद : या खटल्यात राज्य सरकारने प्रख्यात विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. ॲड. निकम यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.

नेमके प्रकरण काय?

१६ नोव्हेंबर २०२५ रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घराबाहेर खेळणारी चारवर्षीय बालिका अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी शोध घेतला असता शाळेजवळील मोबाईल टॉवर परिसरातील झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळला. तपासाअंती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचे समोर आले. या अमानुष घटनेने डोंगराळे गावासह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती.

हा निकाल गुन्हेगाराला केवळ शिक्षा देणारा नव्‍हे तर समाजात अशी दुष्कृत्ये करणाऱ्यांना कठोर जरब बसवणारा आहे. लहान मुलींवरील अत्याचार आणि त्यांच्या हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याच्या माध्यमातून कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

ॲड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news