

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नववर्षाच्या सुरुवातीलाच येणार्या मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने विशेष तयारी केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने या कालावधीत 150 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. श्रीधर यांनी सांगितले की, या गाड्या प्रामुख्याने तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तेलुगू राज्यांसाठी चालवण्यात येणार आहेत.
ए. श्रीधर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, केवळ तेलुगू राज्येच नव्हे तर उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील प्रमुख शहरांनाही या विशेष रेल्वेगाड्यांद्वारे जोडण्यात आले आहे. तिरुपती आणि शिर्डी या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांसाठीही स्वतंत्र विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सणासुदीच्या हंगामात एकूण 600 हून अधिक गाड्या विविध मार्गांवर धावणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील काही प्रमुख स्थानकांचाही समावेश आहे. दरम्यान, मकर संक्रांतीदरम्यान सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.