

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनापूर्वी आयएसआय समर्थित शहझाद भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले. देशभरातून २०० हून अधिक संशयितांना अटक करण्यात आल्याने दिल्लीत दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळून लावण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी ही माहिती दिली.
'एक्स'वर केलेल्या एका पोस्टमध्ये शहा म्हणाले, राज्य पोलिस दलांचा समावेश असलेल्या रिअल टाईम इंटेलिजन्स शेअरिंग सिस्टीमच्या मदतीने १२ ऑगस्ट रोजी ही समन्वित कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली आणि कर्नाटकमध्ये नवीन एफआयआरही दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत आयईडी, पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीचे मार्किंग असलेले ग्रेनेडस्, पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. संरक्षण, धार्मिक स्थळांची रेकी शहझाद भट्टी नेटवर्क हे पाकिस्तानस्थित एक नेटवर्क असून ते भारतातील ग्रेनेड, आयईडी, पेट्रोल बॉम्बहल्ले आणि टार्गेट किलिंग्सशी (लक्षित हत्या) जोडलेले आहे.
सर्वाधिक संशयित उत्तर प्रदेशातील
सर्वाधिक ६२ जणांना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. त्यापाठोपाठ हरियाणामध्ये ५२, दिल्लीत ५१, पंजाबमध्ये ४४ आणि राजस्थानमध्ये १५ जणांना ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्रात ८, उत्तराखंडमध्ये ५, तर कर्नाटक, गुजरात व बिहारमध्ये प्रत्येकी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले. तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर व केरळमध्ये प्रत्येकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.