

2024 साल हे अनेकार्थांनी ऐतिहासिक ठरले आहे. संसदेमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील ऐतिहासिक निर्णय याच वर्षात घेण्यात आला आहे. लोकसभा आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणुकांमुळेही या वर्षात रणधुमाळी पाहायला मिळाली. वक्फ आणि एक देश एक निवडणूक या विधेयकांमुळेही संसदेत गदारोळ पाहावयास मिळाला. सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या ठोस उपाययोजनांमुळे आर्थिक विकास दरही झेपावत आहे. नव्या वर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षातील प्रमुख घडामोडींचा घेतलेला आढावा..
प्रथमेश तेलंग
यंदाच्या वर्षभरात देशभरात वेगवेगळ्या घटना-घडामोडी घडल्या. यामध्ये अनेक घटनांची चर्चा झाली आणि विसरही पडला. मात्र, वर्षाच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत निवडणुकांचा विषय देशात गाजत राहिला. महाराष्ट्रातील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळाली. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेची निवडणूक यामुळे वर्षभर देशात निवडणुकांचे वातावरण होते.
भाजप-एनडीएला सलग तिसर्यांदा यश, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान
लोकसभा निवडणुकीमध्ये सलग तिसर्यांदा भाजप प्रणीत एनडीएचे सरकार आले. मात्र, या निवडणुकीमध्ये भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देशम पक्ष, नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि इतर पक्षांच्या सहाय्याने भाजपने पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. तिसर्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.
राज्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा आले
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला राज्यात मोठा धक्का बसला. तर काँग्रेसने जोरदार पुनरागमन केले. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीने जोरदार कमबॅक केला. भाजपला आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त आमदारांची संख्या निवडून आणता आली. यामध्ये ‘लाडकी बहीण’ यासह इतर गोष्टींचा मोठा वाटा राहिला. भाजपचे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले.
निवडणुकांमध्ये महिलांची वाढती आकडेवारी, निर्णायक भूमिका
लोकसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची टक्केवारी जास्त आहे. तर राज्यातील महिला मतदारांच्या कौलामुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले. झारखंड विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची निर्णय भूमिका ठरली.
लोकसभा-विधानसभा निवडणुकांत भाजपचे एकहाती वर्चस्व
लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात निवडणुका झाल्या. आंध्र प्रदेशमध्ये एनडीए प्रणीत टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, ओडिशामध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली.
लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुका
लोकसभेनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यापैकी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपने सरकार स्थापन केले; तर झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांनी सत्ता स्थापना केली.
विश्वास चरणकर
2024 या सरत्या वर्षात क्रीडा क्षेत्राने देशासाठी अनेक आनंदाचे क्षण दिले. या वर्षात पॅरिस ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, क्रिकेट टी-20 वर्ल्डकप, बुद्धिबळ ऑलिम्पियाड या स्पर्धेत भारतीय तिरंगा अभिमानाने फडकला; पण त्याचसोबत कुस्तीपटू विनेश फोगाटच्या वादाचा डागही या वर्षाला लागला. हॉकीपटू पी. आर. श्रीजेश तर क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विन, शिखर धवन यांनी खेळातून निवृत्ती घेतली. खेळाच्या क्षितिजावर नवे तारे उदयाला आले. माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी जगाचा निरोप घेतला.
पॅरिस ऑलिम्पिक 2024
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे 110 खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले. परंतु, पत्यक्षात 6 पदकांवरच समाधान मानावे लागले. 2020 मध्ये भारताने ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक 7 पदके जिंकली होती. पॅरिसमध्ये भारत सहज 10 पदके आणेल, असे वाटले होते. परंतु, हे ‘स्वप्न’च राहिले. काही पदके थोडक्यात हुकल्याची सल अजूनही मनाला बोचतेय. नेमबाज मनू भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. नीरज चोप्राने सातत्य कायम राखताना सलग दुसर्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले, तर पुरुष हॉकी संघानेही ‘कांस्य’ परंपरा कायम राखली. महाराष्ट्रात 72 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक घेऊन येण्याचा पराक्रम कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळेने करून दाखवला. खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्निलच्या रूपाने महाराष्ट्रात ऑलिम्पिक ‘कांस्य’ पदक आले.
क्रिकेटमध्ये 13 वर्षांनंतर विश्वविजेतेपद
2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी यादगार राहील. जून महिन्यात अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वविजेतेपद मिळवले. यापूर्वी 2011 साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वन-डे विश्वचषक स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. तेव्हापासून हुलकावणी देणारा वर्ल्डकप 13 वर्षांनंतर भारताला मिळाला.
बुद्धिबळासाठी सोनेरी वर्ष
भारतासाठी 2024 हे वर्ष बुद्धिबळ खेळात विशेष ठरले आहे. भारतीय बुद्धिबळ संघांनी काही महिन्यांपूर्वी ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर डी गुकेशने चिनी खेळाडूला हरवून वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. 37 वर्षीय ग्रँडमास्टर कोनेरू हंपीने इतिहास रचला आहे. तिने रविवारी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली आहे.
उमेशकुमार
भारतीय रेल्वे आपल्या इतिहासाची जवळपास 171 वर्षे पूर्ण करून जगात एक नवीन टप्पा गाठत आहे. सर्वसामान्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी रेल्वेने सुरुवातीच्या दिवसांपासून अनेक बदल केले आहेत. रेल्वेचा हा प्रवास पॅसेंजरपासून ‘वंदे भारत’ आणि ‘नमो एक्स्प्रेस’पर्यंत पोहोचला आहे. या यादीत लवकरच बुलेट ट्रेनचाही समावेश होणार आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळे असलेली भारतीय रेल्वे अधिक कार्यक्षमतेकडे आणि जागतिक ओळखीकडे वाटचाल करत आहे.
इतिहासापासून आजपर्यंत पाहिल्यास 16 एप्रिल 1853 रोजी पहिली पॅसेंजर रेल्वे बोरी बंदर (बॉम्बे) ते ठाणे दरम्यान 34 किमी अंतरापर्यंत धावली. ही गाडी साहिब, सुलतान आणि सिंध नावाच्या तीन इंजिनांनी चालवली जात होती. 34 किलोमीटरचा हा प्रवास 1 लाख 26 हजार 366 किलोमीटर रेल्वे जाळ्यापर्यंत पोहोचला आहे.
2024 सालाबद्दल बोलताना, रेल्वेने यूएसबीआरएल प्रकल्प पूर्ण केला. या वर्षी 6 हजार किलोमीटरहून अधिक रेल्वेमार्गाचे नूतनीकरण, विद्युतीकरण, स्टेशन पुनर्विकास, कवच प्रणाली, फ्रेट कॉरिडॉर, वंदे भारत, नमो भारत रॅपिड रेल्वेसह नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात देशातील पहिल्या केबल आधारित रेल्वे पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणीही काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. पुढील वर्षी जानेवारीपासून या पुलाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. बहुप्रतीक्षित नवीन पांबन पुलाचे बांधकामही रेल्वेने पूर्ण केले आहे. मालवाहतुकीतही रेल्वेने नवे विक्रम केले आहेत. जानेवारी-24 ते नोव्हें-24 या कालावधीत, भारतीय रेल्वेवरील मालवाहतुकीचा महसूल 1473.05 मेट्रिक टन इतका आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 3.86 टक्क्यांनी वाढला आहे.
‘वंदे भारत’ देशाची शान
‘वंदे भारत’ ही भारतीय रेल्वेची शान आणि अभिमान बनली आहे. वंदे भारतने सेमी हायस्पीड रेल्वेचे स्वप्न साकार केले आहे. 2017 मध्ये, रेल्वेने सेमी-हाय-स्पीड ट्रेन विकसित करण्याची योजना आखली. यासाठी कोणत्याही परदेशी कंपनीशी करार करण्याऐवजी स्वदेशी तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आणि याची जबाबदारी चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीवर सोपवण्यात आली. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत त्यावर काम सुरू झाले आणि अवघ्या 18 महिन्यांत त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञांनी 2018 साली त्याचा पहिला नमुना तयार केला, ज्याला ‘ट्रेन 18’ असे नाव देण्यात आले. पुढे त्याचे नाव वंदे भारत ठेवण्यात आले.
विशाल शिर्के
पुणे ः आखाती देशांतील युद्धजन्य स्थिती, महागाई, घटलेली निर्यात, अर्थगतीचा मंदावलेला वेग आणि रुपयाची झालेली पडझड, अशा कठीण काळातही भारताने जगातील पाचवी अर्थसत्ता म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.
जगात पाचवी मोठी अर्थसत्ता...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत जगातील पाचवी आर्थिक महासत्ता बनला आहे. देशाची अर्थव्यवस्था 3.89 लाख कोटी डॉलरची आहे.
एफडीआय 1 लाख कोटीपार
थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे देशात एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत 1 लाख कोटी डॉलरची गुंतवणूक झाली आहे.
शेअर बाजाराची भरारी...
या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकाने 10.5 टक्क्यांची वाढ नोंदवली. ऑक्टोबरनंतर शेअर बाजाराची मोठी पडझड झाली.
विदेशी गंगाजळी, सुवर्णसाठा अन् लष्करी ताकद...
ऑक्टोबर महिन्यात विदेशी गंगाजळीचा साठा प्रथमच 700 अब्ज डॉलरपलिकडे गेला होता. सर्वाधिक सुवर्णसाठा असलेल्या देशांमध्ये भारत आठव्या स्थानी आला आहे. देशाकडे 840.76 टन सुवर्णसाठा आहे.
आशिष देशमुख
पुणे ः सरत्या वर्षात देशात तीव्र हवामानाचा मोठ्या घटना घडल्या.यात 3 हजार 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, तर 3.2 दशलक्ष हेक्टर पिकांचे नुकसान झाले. सुमारे अडीच लाख घरे वादळांनी नष्ट केली आणि 9 हजार 400 पेक्षा जास्त पशुधन देशाने गमावले. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या इंडिया क्लायमेट रिपोर्टनुसार 2023 पेक्षा 2024 मध्ये लहरी हवामानाच्या घटनांत मोठी वाढ झाली.
सरत्या वर्षात विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, भूस्खलन, पूर, शीतलहरी, उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळे, हिमवर्षाव, धूळ, वाळूची वादळे, गारपीटीचे प्रमाण वाढले.
2024 मध्ये 274 पैकी 255 दिवस तर 2023 मध्ये 235 दिवस तीव्र हवामानाच्या घटना घडल्या. प्रामख्याने दिल्ली व मुंबईची हवा सतत अतिखराब गटात गणली गेली.
2024 मध्ये देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी 35 राज्यात अशा घटना घडल्या.
कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी 40 पेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झाली.
पुरामुळे मृत्यू केरळ (550), मध्य प्रदेश (353), आसाम (256)
विवेक कुलकर्णी
मस्साजोग आंदोलनाची धग
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी आंदोलनाचे लोण पसरले. 9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची केज-मांजरसुंबा महामार्गावरील डोणगाव फाटाजवळ असलेल्या टोल नाक्यावर अडवून त्यांच्या गाडीच्या काचा फोडून अपहरण केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन जात अपहरणकर्त्यांनी त्यांचा निर्घृण खून केला.
300 दिवस सीमेवर बसलेले शेतकरी
दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी हजारो शेतकरी शंभू बॉर्डर आणि खनौरी बॉर्डरवर जमले होते. मात्र हरियाणा पोलिसांनी कडेकोट बॅरिकेडस् लावले आणि अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर करून शेतकर्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले.
मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात सातत्याने आंदोलने केली. यात अनेकदा त्यांनी आंदोलने काही काळ स्थगित केली. शक्य तितक्या जागांवर मराठा उमेदवार उभे करणार, अशी गर्जना केली होती.
अनुराधा कदम
महिला या समाजव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहेत आणि त्यांनी निश्चय केला तर त्या काही गोष्टींच्या शिलेदार बनू शकतात हे अधोरेखित करणारे 2024 हे वर्ष महिलांसाठी निर्णायक ठरले.
शैक्षणिक धोरणांअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान, गळती रोखण्यासाठी जागृती अशा योजनांमुळे ‘बेटी पढाओ’ला नव्याने बळ आले. महिलांचे आरोग्य या राज्यस्तरावर महत्त्वपूर्ण हाताळल्या गेलेल्या प्रश्नासाठी यंदा मातृत्व आरोग्य योजना, ग्रामीण भागात आरोग्य सेवा, प्रसूती काळातील तणावमुक्तीची कक्षा रुंदावून सुविधांचा परीघ अधिक व्यापक केला.
तिच्या हाती ‘मताची’ दोरी
राजकीय पटलावर यंदा महिलांचे स्थान चर्चेत आले. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर पहिल्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात महिलांच्या मताचा टक्का आणि शिक्का वाढला. परिणामी राजकारणातील महिलांचा सहभाग आणि त्यांची भूमिका यांनी राज्याच्या सत्ताकारणाचेही लक्ष वेधून घेण्यात बाजी मारली. लाडकी बहीण योजना ही यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेची योजना ठरली. या निमित्ताने महिलांचा सत्तास्थापनेतील सहभाग विशेष गाजला.