

रायपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील दंतेवाडा पोलिस आणि सुरक्षा दलांनी रविवारी एक मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा रोकड, शस्त्रे आणि सोन्याचा एक मोठा साठा शोधून जप्त केला. रायपूरपासून सुमारे ४५० किलोमीटर दक्षिणेस असलेल्या बारसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात ही कारवाई करण्यात आली. नुकत्याच आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
१८ लाखांचे सोने आणि रोकड जप्त
सुरक्षा दलांनी तोरमा गावातील घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात शोध मोहीम राबवली होती. या कारवाईत एकूण १८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये अंदाजे १६ लाख रुपये किमतीचे ११६ ग्रॅम सोने आणि २ लाख रुपयांची रोकड समाविष्ट आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर एका ॲसॉल्ट रायफलसह लढाऊ शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांनी भविष्यात सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी आणि आपल्या बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यासाठी हे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीत गाडून ठेवले होते.
नक्षलवादी विचारसरणीला मोठा धक्का
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्मसमर्पण केलेल्या कॅडर्सनी स्वतःहून ही माहिती देणे म्हणजे त्यांनी नक्षलवादी विचारसरणी पूर्णपणे फेटाळल्याचे सिद्ध होते. या कारवाईमुळे सुरक्षा दलांच्या गस्ती पथकांना लक्ष्य करण्याचा नक्षलवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावला आहे. या यशस्वी मोहिमेनंतर दंतेवाडा पोलिसांनी इतर सक्रिय नक्षलवाद्यांनाही हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे.