नवी दिल्ली : देशाची 7 ते 8 टक्के आर्थिक वाढ कायम राखणे हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर केल्यानंतर रविवारी देशभरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
अर्थमंत्री म्हणाल्या की, मजबूत आर्थिक वाढ झाल्यास तिचे फळ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचते. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला 7 ते 8 टक्के वाढीचा दर कायम ठेवावा लागेल. त्यामुळे माझे प्रत्येक धोरण हे वाढ टिकवून ठेवण्यावर केंद्रित असेल, असे त्यांनी नमूद केले. आर्थिक वाढीमुळे रोजगारनिर्मिती होते, अधिक लोक कामगार बाजारात सहभागी होतात आणि उत्पादकता वाढते, असेही त्यांनी सांगितले.
सीतारामन यांनी सांगितले की, महिलांची कार्यक्षमता आणि अचूकता पाहता अनेक नियोक्ते त्यांचा वाढता सहभाग स्वीकारत आहेत. अर्ध-कुशल नोकर्यांमध्ये महिलांची संख्या वाढत आहे. मात्र, कॉर्पोरेट बोर्डरूममध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अजूनही मर्यादित असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. निर्णयप्रक्रियेत प्रभाव टाकण्यासाठी आणि इतरांसाठी आदर्श ठरण्यासाठी अधिक महिलांनी नेतृत्वाच्या भूमिकेत यावे, असे त्या म्हणाल्या.
अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू होते. उद्योगजगतातील प्रतिनिधी, अर्थतज्ज्ञ, कामगार संघटना, विविध हितसंबंधी गट तसेच सोशल मीडियाद्वारे आलेल्या सूचनांचा विचार केला जातो, असे सीतारामन यांनी सांगितले.
गेल्या अर्थसंकल्पापासून सरकारने ‘ऑरेंज इकॉनॉमी’अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्रासाठी सातत्याने धोरणात्मक, आर्थिक आणि संस्थात्मक पाठबळ दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्जनशीलतेला रोज नवे आव्हान देणारे हे क्षेत्र उज्ज्वल असून तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.