

नवी दिल्ली ः एनसीईआरटीने आपल्या इयत्ता सातवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्य पुस्तकात ‘गझनवी आक्रमणे’ नावाचा एक सविस्तर विभाग समाविष्ट केला आहे, ज्यात महमद गझनीच्या स्वाऱ्या, लूटमार, मंदिरांचा विध्वंस आणि त्याने काफिर म्हणून संबोधलेल्या लोकांच्या हत्याकांडाचा समावेश आहे.
अभ्यासक्रम पुनरावृत्तीचा भाग म्हणून एनसीईआरटीने आपल्या इयत्ता सातवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात गझनवी राजवंशावर अधिक व्यापक विभाग जोडून आशयाचा विस्तार केला आहे. या अद्ययावत प्रकरणात महमद गझनीच्या आक्रमणांचे वर्णन केले आहे, ज्यात त्याच्या मोहिमा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये कशा घडल्या, हे सांगितले आहे. तसेच भारतीय शहरांची लूटमार आणि त्याने काफिर म्हणून संबोधलेल्या हिंदू, बौद्ध, जैन आणि अगदी प्रतिस्पर्धी इस्लामिक पंथांच्या लोकांच्या हत्याकांडावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या प्रकरणात महमदने भारतात 17 मोहिमा कशा केल्या आणि प्रत्येक वेळी तो प्रचंड संपत्ती घेऊन परत कसा गेला, हे स्पष्ट केले आहे. मागील इयत्ता सातवीच्या एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकात महमदचा फक्त थोडक्यात उल्लेख होता, तर नवीन पाठ्यपुस्तकात ‘गझनवी आक्रमणे’ नावाचा सहा पानांचा विस्तृत वृत्तांत देण्यात आला आहे. शुक्रवारी ‘एक्स्प्लोरिंग सोसायटीज : इंडिया अँड बियॉन्ड’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात मथुरा आणि सोमनाथसारख्या ठिकाणांवर महमदने केलेल्या हल्ल्यांचे वर्णन आहे आणि त्याच्या मोहिमांदरम्यान झालेल्या व्यापक विध्वंसावर प्रकाश टाकण्यात आला आहे. महमदच्या मोहिमांमध्ये केवळ विध्वंस आणि लूटमारच नव्हती, तर हजारो भारतीय नागरिकांची कत्तल आणि मुलांसह असंख्य कैद्यांना पकडणे यांचाही समावेश होता. पुस्तकात उल्लेख आहे की, त्याचे चरित्रकार त्याला एक शक्तिशाली परंतु क्रूर आणि निर्दयी सेनापती म्हणून चित्रित करतात, जो ‘केवळ काफिरांना (म्हणजेच हिंदू, बौद्ध किंवा जैन) ठार मारण्यासाठी किंवा गुलाम बनवण्यासाठीच नव्हे, तर इस्लामच्या प्रतिस्पर्धी पंथांच्या अनुयायांनाही ठार मारण्यासाठी’ दृढनिश्चयी होता.