

नवी दिल्ली : महात्मा गांधींनी जगाला शांती, सहिष्णुता आणि सत्याचा संदेश दिला, जो संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी अस्पृश्यता, निरक्षरता, व्यसनाधीनता आणि इतर सामाजिक वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. समाजातील दुर्बल घटकांना उभारी आणि आधार देण्याचे कार्य त्यांनी अविचल निश्चयाने केले, असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला विनम्र अभिवादन केले.
देशातील सर्व नागरिकांच्या वतीने मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. हा दिवस म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आदर्शांना व मूल्यांना पुन्हा एकदा वाहून घेण्याची संधी आहे, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या संपूर्ण जीवनात महात्मा गांधींनी नैतिकता आणि सदाचारावर अखंड विश्वास ठेवला आणि जनतेलाही त्याच मार्गावर चालण्यास प्रेरित केले. चरख्याच्या माध्यमातून त्यांनी स्वावलंबनाचा संदेश दिला व स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर आणि सुशिक्षित भारत घडविण्याचे स्वप्न दाखवले. श्रमाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांनी आचरण आणि शिकवणीतून नेहमीच उदाहरण घालून दिले. त्यांच्या जीवनमूल्यांची उपयुक्तता आजही कायम आहे आणि ती भविष्यातही आपले मार्गदर्शन करत राहील.
2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आपण पुन्हा एकदा सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा, राष्ट्राच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी समर्पित राहण्याचा आणि स्वच्छ, सक्षम, पूर्णतः सशक्त व समृद्ध भारत घडवून गांधीजींचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प करूया, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.