

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
राजधानी दिल्लीत देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतल्याची माहिती आहे. मुख्यंमत्र्यांचा दिल्ली दौरा दौरा शासकीय असला तरी याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागून होते. त्यानंतर विविध अंदाज वर्तवले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि महायुतीबद्दल चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत ज्या भागात महायुतीला नुकसान झालेल्या भागावरही चर्चा झाल्याचे समजते. याच आठवड्यात राज्यातील निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभेची निवडणूक महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र लढणार आहेत. यात जागावाटप आणि अन्य काही गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अशा कुठल्याही चर्चां झाल्याचा इन्कार केला. असे असले तरी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या बैठकीची चांगलीच चर्चा होती. या बैठकीकडे राज्यातील भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचेही लक्ष असल्याचे समजते.