

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी ६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांच्या नावाचा समावेश आहे. यापैकी प्रज्ञा सातव यांचे नाव विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी जाहीर झाले आहे.
त्या व्यतिरिक्त इतर पाचही उमेदवारांची नावे नियमित रूपाने रिक्त झालेल्या विधान परिषद मतदारसंघांसाठी जाहीर झाली आहेत. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. यासाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल.
भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्र!
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देताना भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. मागील अनेक वर्षे पक्ष संघटनेत प्रदेश पातळीवर काम करत असलेल्या माधवी नाईक, अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेते विवेक कोल्हे आणि पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांची नावे अपेक्षित होती. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये येताना आमदारकीचा राजीनामा दिला होता, त्याच रिक्त जागेवर त्यांना भाजपने संधी दिली आहे.
इतर जागांसाठी विदर्भातून नागपूरचे संजय भेंडे, कोकणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमोद जठार तर प्रदेश पातळीवर कार्यरत असलेले सुनील कर्जतकर यांनाही उमेदवारी दिली. या माध्यमातून प्रादेशिक आणि सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. दरम्यान, चर्चेत असलेल्या अनेक नेत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.