

नवी दिल्ली; पीटीआय : कार आणि ट्रकसारख्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर राहिला आहे. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशने पहिले स्थान पटकावले आहे.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ने (एसआयएएम) दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 10 लाख 39 हजार कारची विक्री झाली. त्यातील 3 लाख 44 हजार कार पश्चिम भारतात विकल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 1 लाख 31 हजार 822 कार सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत विकल्या गेल्या आहेत. एकूण कार विक्रीतील महाराष्ट्राचा वाटा तब्बल 12.7 टक्के आहे. खालोखाल उत्तर प्रदेशात 1 लाख 481 कारची विक्री झाली असून, एकूण विक्रीतील त्यांचा वाटा 9.7 टक्के आहे. गुजरातमध्ये 87 हजार 901 कारची विक्री झाली आहे. एकूण कार विक्रीतील गुजरातचा वाटा 8.5 टक्के आहे. कर्नाटक 76 हजार 422 आणि केरळमध्ये 69 हजार 609 कारची विक्री झाली आहे.
देशात ट्रक, प्रवासी बससारख्या 2 लाख 40 हजार व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. त्यातील 92 हजार वाहने पश्चिम भारतात विकली गेली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 37 हजार 91 वाहनांची विक्री झाली असून, एकूण विक्रीत 15.5 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. गुजरातमध्ये 22 हजार 491 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली आहे. एकूण विक्रीत 9.4 टक्के वाटा व्यावसायिक वाहनांचा आहे. उत्तर प्रदेश तिसर्या स्थानी असून, 19 हजार 9 वाहनांची राज्यात विक्री झाली आहे. तामिळनाडूत 18 हजार 508 आणि कर्नाटकात 16 हजार 743 वाहनांची विक्री झाली आहे.
55.62 लाख दुचाकींची देशात विक्री
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 55 लाख 62 हजार दुचाकींची विक्री झाली असून, त्यातील 19 लाख 33 हजार वाहनांची विक्री पश्चिम भारतात झाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 6 लाख 92 हजार 869 दुचाकींची विक्री झाली असून, खालोखाल महाराष्ट्रात 6 लाख 29 हजार 131 दुचाकी विकल्या गेल्या आहेत. तर, गुजरातमध्ये 4 लाख 45 हजार 722, तामिळनाडूत 3 लाख 98 हजार 618 आणि राजस्थानमध्ये 3 लाख 60 हजार 966 दुचाकींची विक्री झाली आहे.