

नवी दिल्ली : वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याचाच परिणाम म्हणून या सुरू असलेल्या भारत टेक्स एक्स्पो मध्ये महाराष्ट्रासोबत ३८० कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत, या करारामधून राज्यात २ हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान 'भारत टेक्स एक्सपो 2025' आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याने नॉलेज पार्टनर राज्य म्हणून सहभाग घेतला आहे. शनिवारी विविध सामंजस्य करार वस्त्र उद्योग मंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आज महाराष्ट्र राज्याचे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले त्यावेळी सावकारे बोलत होते.
यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सावकारे, केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव नीलम शमीरा, राज्यातील वस्त्र उद्योग विभागाचे सचिव सचिव वीरेंद्र सिंह , वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, रेशिम संचालनालयचे संचालक डॉ.विनय मून मंचावर उपस्थित होते.
एक्स्पो मध्ये संबोधित करताना मंत्री संजय सावकारे म्हणाले की, वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. महाराष्ट्रात या संदर्भात चांगले काम होत आहे. महाराष्ट्र शासनाने वस्त्र उद्योग क्षेत्रासाठी नवनवीन योजना तयार करून अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी महाराष्ट्र शासन वीज पुरवठा जमीन उपलब्ध करून देणे आणि याशी निगडित असणाऱ्या बाबींवर अनुदान देत आहे. याचा परिणाम वस्त्रोद्योग चांगली भरारी घेत आहे. केंद्र सरकारचा महाराष्ट्र राज्य शासनाला पूर्ण पाठिंबा असल्याचेही सावकारे यांनी यावेळी सांगितले.