

Maharashtra government's big decision for a multi-purpose cultural building in Delhi; Plan presented in the presence of Fadnavis
नवी दिल्ली : दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनामार्फत दिल्लीमध्ये बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र सदन परिसरात त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्याचा प्रस्तावित आराखडा निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकताच सादर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी महाराष्ट्र सदनाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत आर. विमला यांनी विविध प्रस्ताव सादर केले. यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक भवनाबाबत सविस्तर चर्चा झाली. या सांस्कृतिक भवनामध्ये बहूउद्देशीय सभागृह, महाराष्ट्रातील भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध पदांसाठी मुलाखत पात्र उमेदवारांसाठी निवास व्यवस्था, प्रशस्त ग्रंथालय, अभ्यासिका आणि अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
तसेच महाराष्ट्र सदन परिसरातील अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने आणि अन्य प्रशासकीय बाबींसंदर्भात सविस्तर सादरीकरण निवासी आयुक्त विमला यांनी केले. यासह महाराष्ट्रातील ऋतूनिहाय फळांचे प्रदर्शन-विक्री दालन आणि बचत गटांच्यामार्फत उत्पादित वस्तूचे प्रदर्शन दालन वर्षभरासाठी या ठिकाणी असावे या संदर्भात सुरु असलेल्या नियोजनची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र महोत्सव दिल्लीत आयोजित करण्यात यावा यामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडाविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विमला यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली असून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
या सादरीकरणास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक मनीषा पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता किरण चौधरी, विद्युत विभागाचे आशुतोष द्विवेदी, माहिती अधिकारी अंजु निमसरकर कांबळे, महाराष्ट्र सदनाचे प्रभारी व्यवस्थापक प्रमोद कोलपते आदी उपस्थित होते.