

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना त्यांच्या स्वतःच्या विद्यमान कर्तव्यांसोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्त केले.
देशाचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते. उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. आचार्य देवव्रत हे सध्या गुजरातचे राज्यपाल असून यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. ते मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील आहेत.