

Indian National Congress Maharashtra update
नवी दिल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये राजकीय व्यवहार समितीत ३६ वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, ५ वरिष्ठ प्रवक्ते, १०८ सरचिटणीस, ९५ चिटणीस, ८७ नेते कार्यकारी समितीमध्ये आहेत.
हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष होऊन जवळपास सहा महिने झाले. मात्र तरीही काँग्रेसची कार्यकारिणी यादी जाहीर झाली नव्हती. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी रात्री उशिरा ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये बहुतांश जुनेच नेते आहेत. काही ठिकाणी मात्र नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले.
राजकीय व्यवहार समिती आणि कार्यकारी समितीमध्ये प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि राज्यातील इतरही प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. तर अनंत गाडगीळ, अतुल लोंढे, धीरज देशमुख, गोपाळ तिवारी, सचिन सावंत यांची वरिष्ठ प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. माध्यम समन्वयक म्हणून पुन्हा एकदा श्रीनिवास बिक्कड यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रदेश काँग्रेसची बहुप्रतिक्षित कार्यकारिणी आल्यानंतर काहींना आनंद झाला तर काही लोक नाराजी असल्याचे समजते. यादीमध्ये नावांच्या क्रमवारी वरूनही काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचे समजते.