

बंगळूर : कन्नड बोलता येत नसल्याने महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाला काळे फासून मारहाण करण्यात आली. तसेच बसलाही काळे फासण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. 22) चित्रदुर्ग येथे घडली. या घटनेत चालक जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. भास्कर जाधव असे जखमी बसचालकाचे नाव आहे. ही बस बंगळूरहून मुंबईकडे येत होती. या घटनेमुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत असून तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहेत.मारहाणीच्या घटनेमुळे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस चालक व वाहकांनी आपल्याला सुरक्षा दिली तरच आपण कर्नाटकात बस घेऊन जाऊ, अशी भूमिका घेतली आहे.
बेळगाव तालुक्यातील सुळेभावी बसच्या वाहकाने महाविद्यालयीन तरुणीला तिकिटावरून शिवीगाळ केल्याच्या संतापातून काही तरुणांनी चालकाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. 21) दुपारी घडली होती. मात्र या प्रकरणाला कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भाषिक रंग देण्याचा प्रयत्न करत राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. यातूनच चित्रदुर्गजवळील ऐमंगळ टोल नाक्याजवळ महाराष्ट्र परिवहनची बस येताच बस थांबवून चालकाला बसमधून बाहेर काढले. तुम्हाला कन्नड येते का, अशी विचारणा करत त्यांना मारहाण केली. तसेच त्यांना काळे फासले. त्यानंतर बसलाही काळे फासले. यात चालक जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाला विनाकारण भाषिक रंग देण्याचा प्रयत्न ‘करवे’कडून करण्यात आला असल्यामुळे मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहेे. ठाकरे गटातर्फे या घटनेचा निषेध नोंदवत कोल्हापुरातील बसस्थानकात जोरदार घोषणाबाजी करण्या आली. यावेळी ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक सरकारला इशारा देत कर्नाटकच्या बसवर भगवे ध्वज फडकवले.
सुळेभावी येथील घटनेमुळे राज्यभर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बंगळूरमधील म्हैसूर बँक सर्कल येथे निदर्शने करून काही काळ रस्ता रोखला. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचा निषेध करून प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. त्याचबरोबर अनेकल, म्हैसूर, रामनगर, बिदादी, चामराजनगर, चित्रदुर्ग, दावणगेरेसह अनेक ठिकाणी रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.