

उत्तर प्रदेश : पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभात सहभागी होण्यासाठी लाखो कोटींच्या संख्येने लोक येत आहेत. या भाविकांना जेवण पुरवण्यासाठी जागो-जागी भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अशा आयोजनादरम्यान एक धक्कादायक आणि चिड आणणारा व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पोलिस अधिकार्याने महाकुंभात येणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात येणाऱ्या भंडाऱ्याच्या तयार होणाऱ्या प्रसादाच्या जेवणात राख टाकली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे.
भंडाऱ्याच्या जेवणाच्या प्रसादात पोलिसाकडून राख टाकल्याचा व्हिडिओ जेंव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेंव्हा युपी पोलिस ॲक्शन मोडवर आली. या घटनेशी संबंधित पोलिस हा सोरांव ठाणा प्रभारी बृजेश कुमार तिवारी असल्याचे समोर आले. गुरूवारी पोलिस उपायुक्त (गंगा नगर) कुलदीप सिंह गुनावत यांनी या ठाणा प्रभारीला निलंबित केले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चुलीवर मोठी भांडी ठेवण्यात आली आहेत. ज्यामध्ये प्रसादाचे जेवण तयार होत आहे. त्यावेळी एक पोलिस कर्मचारी तेथे येतो आणि तयार होणाऱ्या जेवणामध्ये राख टाकतो. या घटनेचा व्हिडिओ समोर येताच सर्व स्तरातून या अधिकाऱ्यावर टीकेची झोड उठली. ही घटना लाजीरवाणी असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. या पोलिस कर्मचाऱ्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या घटनेची पोलिस विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली. यूपी पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण पाहता पोलिस उपायुक्त (गंगानगर) व्दारा एसपी सोरांव यांच्या अहवालाच्या आधारावर सारांव ठाणा प्रभारींना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा व्हिडिओ x वरून शेअर केला आहे. त्यांनी लिहिलंय की, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. जे लोक महाकुभात अडकले आहेत, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना राजनीतिक विद्वेशातून राख टाकली जात आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. ३० जानेवारीच्या महाकुंभात गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमात जवळपास २ कोटींहून अधिक लोकांनी स्नानाची पर्वणी साधली आहे. महाकुंभाला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत ३० कोटींहून अधिक लोकांनी संगमात स्नान केले आहे.