महाकुंभातील चेंगराचेंगरीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ

Assembly Budget Session| काँग्रेस अध्यक्ष खर्गेंची मृतांची संख्या जाहीर करण्याची मागणी
Assembly Budget Session
File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- सोमवारी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाकुंभात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या मृत्यूंवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने विरोधकांनी सभात्याग करून निषेध व्यक्त केला.

प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची 'खरा' आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवर काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले भाषण केले. ते म्हणाले की, माझे भाषण सुरू करण्यापूर्वी मी महाकुंभातील मृतांना, कुंभात प्राणांची आहुती देणाऱ्या हजारो लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. खर्गे यांच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर खर्गे म्हणाले की हा माझा अंदाज आहे. जर हे चुकीचे असेल तर मला सांगा. जर हे खरे नसेल तर सत्य काय आहे, ते मला सांगा.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खर्गेंना त्यांचे हजारो लोकांच्या मृत्यूचा उल्लेख केलेले विधान मागे घेण्यास सांगितले. त्यावर खर्गे म्हणाले की, हा माझा अंदाज आहे. जर आकडे बरोबर नसतील तर सरकारने सत्य काय आहे ते सांगावे. मी कोणालाही दोष देण्यासाठी ‘हजारो’ असे म्हटले नाही. परंतु किती लोक मृत पावले, याची माहिती देण्यात यावी, असेही खर्गे म्हणाले.

लोकसभेत विरोधकांचा सभात्याग

लोकसभेतही विरोधकांनी कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर चर्चा करण्याची मागणी केली. विरोधकांनी वेलमध्ये उतरून त्यांच्या मागण्यांबाबत घोषणाबाजी केली. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, जनतेने तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी पाठवले आहे की टेबल तोडण्यासाठी येथे पाठवले आहे? जर तुम्हाला टेबल तोडण्यासाठी पाठवले असेल तर अधिक जोराने टेबलांवर आदळआपट करा, असे उपरोधिकपणे ते म्हणाले. यानंतरही विरोधी खासदारांनी गोंधळ सुरूच ठेवला. कुंभमेळ्यातील मृतांची आकडेवारी सरकारने जाहीर करावी अशी मागणी करत ते घोषणाबाजी करत राहिले. विरोधकांनी केंद्र सरकारला शुद्धीवर येण्यास सांगितले. ‘योगी सरकारने राजीनामा द्यावा, सनातन विरोधी सरकार’ अशी घोषणाबाजीही विरोधकांकडून करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. काही वेळानी ते पुन्हा सभागृहातून आले.

पीठासीन अधिकारी सरकारच्या मदतीला धावले

महाकुंभ अपघातातील मृतांच्या संख्येवरून विरोधकांच्या गदारोळात सरकार घेरलेले दिसून आले. विरोधकांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. हे पाहून, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांनी सरकारचा बचाव करण्याची जबाबदारी घेतली. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना मृतांच्या संख्येबाबतचे त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले. खर्गे यांनी मृतांची संख्या हजारोंमध्ये सांगितली होती. मात्र, खर्गे यांनी स्पष्ट केले की त्यांनी अंदाज दिला आहे. सरकारने याबाबत योग्य माहिती समोर आणावी. दुसरीकडे लोकसभेत, विरोधकांच्या याच मागण्यांवर सरकारचा बचाव करण्यात अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढाकार घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news