

पुढारी वृत्तसंस्था : महाकुंभ मेळ्यास प्रारंभ होण्यास अवघे दोन दिवस उरले आहे. देश-विदेशातील साधू-महंतांसह साध्वींचेही आगमन झाले आहे. या मेळ्यात साध्वींची उपस्थिती लक्षणीय आहे. 143 वर्षांपूर्वीच्या महाकुंभ मेळ्यासाठी 20 हजार खर्च आला होता. 2025 सालच्या महाकुंभचे बजेट 5435 कोटींवर आहे. 1882 साली महाकुंभ मेळ्यासाठी 20,288 वर खर्च आला होता. त्यावेळी देशाची लोकसंख्या 22.5 कोटी होती. आठ लाख भाविकांनी संगमामध्ये स्नान केले होते.
2019 सालच्या कुंभ मेळ्यासाठी 4200 कोटी खर्च आला होता. यावेळच्या महाकुंभ मेळ्यासाठी सात हजार कोटींवर खर्चाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून दोन हजार कोटींची मदत मिळणार आहे.
महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 7 हजार अतिरिक्त बसेसची सुविधा केली आहे. महाकुंभ मेळ्यात भाविकांना संगमावर पवित्र स्नान करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून बसेसची सेवा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्येच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रयागराजच्या विकासकामासाठी अन्य जनकल्याण योजनांची घोषणा या बैठकीत करण्यात येणार आहे.
या मेळ्यासाठी तीन हजार विशेष रेल्वे गाड्यांचीही भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये भाविकांना वास्तव्यासाठी किमान भाडे द्यावे लागेल, अशी सोयही करण्यात आली आहे.