पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संस्कृतीत श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा सोहळा म्हणून महाकुंभमेळाची जगभरात ओळख आहे. म्हणूनच मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरु असणारा ( Mahakumbh 2025) हा धार्मिक उत्सव जगासाठी लक्षवेधी ठरला आहे. बुधवारी (दि.१२) माघी पोर्णिमेनिमित्त महाकुंभमेळ्यासाठी भाविकांची झालेली गर्दीही विश्वविक्रमाकडे वाटचाल करणारीच ठरली. आतापर्यंत महाकुंभमध्ये ४८ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिळ सोहळा अशी ओळख झालेल्या महाकुंभमध्ये आता पुढील चार दिवसांमध्ये चार विश्वविक्रम होणार आहेत. याविषयी जाणून घेवूया...
शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी १५,००० स्वच्छता कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरातील गंगा नदीच्या काठाचा १० किमी लांबीचा भाग स्वच्छ करतील. यापूर्वी २०१९ च्या महाकुंभमेळ्यात १०,००० कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे घाटांची स्वच्छता केली होती आणि अशा प्रकारे भारत स्वतःचाच विक्रम मोडत एक नवीन टप्पा गाठणार आहे.
शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या विश्वविक्रमात प्रयागराजमधील संगमातील पाण्याचा प्रवाह ३०० हून अधिक लोक स्वच्छ करतील, जो एक नवीन विक्रम असेल. विक्रमांच्या मालिकेत रविवार, १६ फेब्रुवारी रोजी त्रिवेणी मार्गावरील परेड ग्राउंडवर एकाच वेळी १,००० ई-रिक्षा चालवल्या जातील.रविवार, १६ फेब्रुवारी रोजी १००० ई-रिक्षा चालवण्याचा विक्रमही केला जाईल. तर सोमवार १७ फेब्रुवारी रोजी १० हजार लोकांच्या हाताचे ठसे उमटविण्याचा रेकॉर्डही बनवला जाईल. चारही रेकॉर्ड करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आल्याचे महाकुंभमेळा अधिकारी विजय किरण आनंद यांनी म्हटलं आहे. या विश्वविक्रमाची नोंद ठेवण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची टीमही प्रयागराजमध्ये आले आहे. त्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पूर्ण होत आहे.
२०१९ च्या प्रयाग येथील कुंभमेळ्यात तीन विक्रमही झाले होते. याची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली हाोती. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी, उत्तर प्रदेश राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (UPSRTC) द्वारे चालवल्या जाणाऱ्या ५०० बसेसची परेड राष्ट्रीय महामार्ग-१९ वर काढण्यात आली आणि कुंभमेळ्यादरम्यान "बसच्या जगातील सर्वात मोठ्या परेड" साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. या बसेसनी एकाच ३.२ किमी पेक्षा जास्त अंतर कापत २०१० मध्ये अबू धाबीमध्ये ३९० बसेसनी एकाचवेळी परेड करण्याचा विक्रम मोडित काढला होता. २०१९ च्या कुंभमेळ्यात ७,६६४ व्यक्तींनी हाताने ठसे उमटवित चित्राचा विक्रम केला होता. महाकुंभात चार विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न १४ फेब्रुवारीपासून सुरू होईल. प्रथम, स्वच्छतेचा विक्रम, नंतर नदी स्वच्छता, नंतर ई-रिक्षा आणि शेवटी हाताने छपाईचा विक्रम केला जाईल आणि या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाकुंभाचे डीएम विजय किरण आनंद यांनी दिली.