महाकुंभ २०२५ : अमिताभ, आलिया आणि रणवीरसह कलाकार घेणार संगमात डुबकी
प्रयागराज (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन
प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीयांमध्ये या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्याला महत्व आहे. त्यामुळे लाखो श्रध्दाळू या ठिकाणच्या पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी हजेरी लावत असतात. अनेक सेलिब्रिटीसुद्धा संगमात डुबकी मारून पुण्य प्राप्त करतात. महानायक अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणवीर कपूर आणि ड्रामा गर्ल राखी सावंत यांच्यासह अनेक बॉलिवूड-टॉलीवूड कलाकार गंगा, यमुना आणि अदृष्य सरस्वती नदीच्या संगमावर डुबकी घेणार आहेत. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या शिबिरांमध्ये या सिनेकलाकारांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
संगमाच्या वाळूवरील महाकुंभावर हे चित्रपटसृष्टीतील कलाकार अध्यात्माच्या रंगात रंगुन जाणार आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणवीर कपूर यासारखे दिग्गज कलाकार नद्यांच्या पवित्र संगमावर डुबकी घेत पवित्र स्नानाचा आनंद घेणार आहेत.
चित्रपट कलाकारांचे आगमण हे पौष पौर्णिमेपासून सुरू होणार आहे. बॉलिवूड, टॉलिवूडपासून भोजपुरी आणि छोट्या पडद्यावरील अनेक नामवंत कलाकार यावेळी गुरूंच्या शरणात येतील. त्यांचे मार्गदर्शन घेतील. मात्र ते केंव्हा येणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.
काशीतून देवतांच्या ७० मूर्ती बसवण्यात येणार
महाकुंभात देवी-देवतांचे तेजही झळाळून येणार आहे. तसेच विष्णू अवतार, समुद्र मंथन, त्रिदेव, रामदरबार आणि नवदुर्गा इत्यादी देवी-देवतांचे दर्शन होईल. काशीमध्ये देवी-देवतांच्या 70 चित्ररथही तयार करण्यात आल्या आहेत. जी महाकुंभात बसवली जाणार आहे.
ॲपद्वारे पार्किंगची जागा हाेणार उपलब्ध
पार्कींग कंपनीने मंगळवारी महाकुंभमध्ये ऑटो-टेक सुपर ॲप लाँच केले. यामुळे लाखो यात्रेकरूंना पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
२५ लाखाहून अधिक वाहने येण्याचा अंदाज
४५ दिवसांपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात ४० कोटीहून अधिक तीर्थयात्री आणि २५ लाखांहून अधिक वाहने येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाविक पार्किंग ॲपच्या माध्यमातून सुरक्षित पार्किंग आणि प्री बुकिंग आणि प्री पेमेंट करू शकणार आहेत.

