

नवी दिल्ली : सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष गाडी दिल्लीत दाखल झाली. जवळपास १४०० साहित्यिक आणि साहित्य प्रेमी या विशेष एक्सप्रेसद्वारे राजधानी दिल्लीत दाखल झाले. सरहद, पुणे आणि दिल्लीतील विविध मराठी संस्थाच्या वतीने या एक्सप्रेस मधील सर्व प्रवाशांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ही गाडी रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर माय मराठीचा जयघोष करण्यात आला.
२१ फेब्रुवारीपासून २३ फेब्रुवारी पर्यंत राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा आहेत तर ज्येष्ठ नेते शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. पुढचे ३ दिवस दिल्लीत साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांची आणि उपक्रमांची रेलचेल असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत (तालकतोरा स्टेडियम) मध्ये हे साहित्य संमेलन होत आहे.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे गाडी पुण्याहून दिल्लीकडे रवाना झाली. पुणे ते दिल्ली जवळपास ३० तासांच्या या प्रवासामध्ये साहित्ययात्री संमेलन पार पडले. मराठी भाषा व उद्योग मंत्री या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. पुण्याहून या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी नगर पर्यंत प्रवास केला आणि सर्वच डब्यांमध्ये जाऊन साहित्यिक आणि साहित्यप्रेमींशी संवादही साधला. शरद तांदळे या संमलेनाचे अध्यक्ष तर वैभव वाघ कार्यकारी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष शरद गोरे होते. या सर्व मंडळींसह उपस्थितांनीही संमेलनात सहभाग घेतला.