Mahadev Betting App : महादेव ॲपचा 'मास्टरमाइंड' भारताच्या ताब्यात; कसा चालायचा ६ हजार कोटींच्या 'बेटिंग'चा खेळ?

ओमानमधील मस्कत येथे जून महिन्यात सौरभ चंद्रकरला घेण्‍यात आले होते ताब्यात
Mahadev Betting App
Mahadev Betting App Pudhari Photo.
Published on: 
Updated on: 
Summary

६,००० कोटी रुपयांच्या 'महादेव' ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्रकर याला भारतीय तपास यंत्रणांनी रविवारी ओमानमधून भारतात परत आणले आहे.

Mahadev Betting App : देशातील बहुचर्चित तब्बल ६,००० कोटी रुपयांच्या 'महादेव' ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्रकर याला भारतीय तपास यंत्रणांनी रविवारी ओमानमधून भारतात परत आणले आहे. त्याला ओमानमधील मस्कत येथे जून महिन्यात ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर, केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनी त्याला भारतात परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. चंद्रकर पुन्हा भारतीय तपास यंत्रणेच्या ताब्यात येणे हे मागील काही दिवसांमधील सर्वात मोठ्या यशांपैकी एक मानले जात आहे.

छत्तीसगडमधील राजकारण्यांसह अधिकाऱ्यांच्या कनेक्शनचा आरोप

६,००० कोटी रुपयांच्या 'महादेव' ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात छत्तीसगडमधील राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला असून, या दृष्टीने तपास सुरू आहे.

Mahadev Betting App
Mahadev betting app case | ‘महादेव अ‍ॅप’चा भूलभुलैया! साहिल खाननंतर आता कोणाचा नंबर?

काय आहे महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरण?

सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांच्या हवाल्याने 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'महादेव ऑनलाइन बुक'ने २०१९-२० मध्ये आपला बेकायदेशीर कारभार सुरू केला. छत्तीसगडमधील भिलाई येथे छोटे व्यावसायिक अशी ओळख असणाऱ्या चंद्राकर आणि उप्पल यांनी हे रॅकेट सुरू केले. यानंतर त्यावर नियंत्रण ठेवले. या रॅकेटशी संबंधित अनेक प्लॅटफॉर्म आणि ॲप्सवर बंदी असूनही संपूर्ण देशात बेकायदेशीर बेटिंगचे जाळे पसरले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे पोकर आणि पत्त्यांचे इतर खेळ, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल सामने, इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या निकालांवरही बेकायदेशीरपणे सट्टा लावू शकतात.

कोरोना काळात बेटिंगमध्ये वाढ

२०२० मध्ये कोरोना महामारी आली. या काळात लॉकडाउनमुळे 'महादेव ऑनलाइन बुक'च्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर ती वाढतच गेली. ॲप लोकप्रिय झाल्यानंतर चंद्राकर आणि उप्पल हे दोघेही आपल्या मित्र-परिवारासह युएई (UAE) मध्ये जाऊन स्थायिक झाले. येथूनच ते बेटिंगचा कारभार पाहत होते.

Mahadev Betting App
Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक

भारतातील बेकायदा कामे सोपवली 'पॅनेल पार्टनर्स'कडे

"भारतात बेनामी बँक खाती उघडणे, सट्टेबाजीसाठी ऑफिस चालवणे, जाहिरातबाजी करणे आणि मनी लाँड्रिंग ही सर्व कामे 'पॅनेल पार्टनर्स'कडे सोपवली गेली होती. या बदल्यात त्यांना नफ्यातील ठराविक हिस्सा दिला जात असे. मात्र, ॲपचे सॉफ्टवेअर, ग्राहक आणि पैशांचा संपूर्ण ताबा दुबईत बसलेले मुख्य संचालक स्वतःकडेच ठेवत असत," अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

३,२०० 'बेटिंग पॅनेल', १,००० 'व्हॉट्सॲप ऑपरेटर'

ईडीच्या माहितीनुसार, भारत आणि युएईमध्ये मिळून किमान ३,२०० 'बेटिंग पॅनेल' कार्यरत आहेत, तर युएईमधील मुख्य कॉल सेंटरमध्ये सुमारे १,००० 'व्हॉट्सॲप ऑपरेटर' काम करत आहेत. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, एका 'पॅनेल'द्वारे मिळणाऱ्या नफ्यापैकी सुमारे ७०% ते ८०% हिस्सा मुख्य कार्यालयाकडे (हेड ऑफिस) पाठवला जातो. यातून दरमहा अंदाजे ९५० कोटी रुपयांची कमाई होत असल्याचे समोर आले आहे. 'महादेव ऑनलाइन बुक'च्या (MOB) आणि संबंधित प्लॅटफॉर्मशी निगडित व्यवहारांचे मूल्य सुमारे ९४,००० कोटी रुपये इतके आहे. यापैकी ४,००० ते ५,००० कोटी रुपये आधीच प्रवर्तकांपर्यंत (प्रमोटर्स) पोहोचवण्यात आले आहेत.

Mahadev Betting App
Mahadev Betting Case: महादेव बेटिंग प्रकरणात ७६५.७७ कोटींच्या व्यवहारांचा ईडीकडून तपास

दुबईस्थित मुख्य कार्यालयात हजारो कर्मचारी

दुबईस्थित मुख्य कार्यालयात हजारो कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले होते. यामध्ये प्रामुख्याने छत्तीसगडमधील भिलाई आणि आसपासच्या जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश होता. तपासादरम्यान असेही समोर आले की, आरोपींनी आपल्या ३,५०० कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी दुबईमध्ये २० व्हिला भाड्याने घेतले होते. चंद्रकर आणि उप्पल यांनी आपल्या मूळ भागातील लोकांच्या विश्वासाचा फायदा घेतला. अगदी डेहराडून आणि पंजाबसारख्या दूरच्या ठिकाणीही छत्तीसगडमधील तरुणांनाच कामावर ठेवण्यात आले होते.

कर्मचारी वर्गातील मुख्य गट 'चेकर्स'

'महादेव ऑनलाइन बुक'च्या कर्मचारी वर्गातील मुख्य गटाला 'चेकर्स' म्हटले जात असे. ते १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत असत. त्यांचे काम 'पॅनेल'च्या खात्यांवर लक्ष ठेवणे, पैसे न भरणाऱ्या (डिफॉल्टर्स) व्यक्तींची ओळख पटवणे असे होते. हे सर्व कर्मचारी भाड्याने घेतलेल्या व्हिलामध्ये एकत्र राहत असत. या ठिकाणी या सर्वांना किराणा माल आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या जात. तपासादरम्यान, या व्हिलाच्या नावावर असलेली किराणा मालाची बिलेही जप्त करण्यात आली आहेत.

ईडीकडून ११६ जणांविरुद्ध सहा आरोपपत्रे दाखल

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत ११६ जणांविरुद्ध सहा आरोपपत्रे (चार्जशीट) दाखल केली आहेत. १४ जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय (CBI) देखील 'एमओबी'शी संबंधित दोन प्रकरणांचा तपास करत असून, त्यांनीही एक आरोपपत्र दाखल केले आहे. चंद्रकरला रविवारी (१ नोव्हेंबर) ओमानमधून प्रत्यार्पित करण्यात आले आहे. उप्पलला दुबईतून भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mahadev Betting App
Betting Apps Case | बेटिंग ॲप्स प्रचार प्रकरणी सोनू सूद-उर्वशी रौतेलाची ईडी चौकशी

माजी मुख्यमंत्री बघेल यांच्यावरही झाला होता गुन्हा दाखल

'महादेव ऑनलाइन बुक' प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरमध्ये (FIR) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचेही नाव आरोपी म्हणून समाविष्ट आहे, मात्र अद्याप कोणत्याही आरोपपत्रात त्यांचे नाव आलेले नाही. ईडीने आपल्या एका आरोपपत्रात असा दावा केला आहे की, चंद्रकर आणि उप्पल यांनी भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपयांची लाच दिली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये, तपास संस्थेने बघेल यांचे सल्लागार विनोद वर्मा यांच्या निवासस्थानीही झडती घेतली होती. बघेल यांनी आपल्यावरील सर्व आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.