

पुढारी ऑनलाईन डेस्क : फक्त चुकीचे बोलणे, हेच समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचे काम आहे. आम्हीही प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला भेट दिली होती. येथे चेंगराचेंगरीची घटना घडली ; पण ती इतकी मोठी नव्हती, असा दावा भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केला. (Maha Kumbh stampede) उत्तर प्रदेश सरकार महाकुंभमेळ्यासारख्या भव्य कार्यक्रमाचे व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे करत आहे, असेही त्या म्हणाल्या.
माध्यमांशी बोलताना खासदार हेमा मालिनी म्हणाल्या की, "अखिलेश यादव यांचे काम फक्त चुकीचे बोलणे आहे. आम्हीही कुंभमेळ्याला भेट दिली. ही घटना घडली होती, पण ती इतकी मोठी नव्हती. या दुर्घटनेबाबत अतिशयोक्तीपूर्ण विधाने केली जात आहेत. उत्तर प्रदेश सरकार महाकुंभमेळ्यासारख्या भव्य कार्यक्रमाचे व्यवस्थापन अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहे. महाकुंभमेळ्यास भाविकांची अलोट गर्दी होत आहे. ही गर्दी व्यवस्थापित करणे खूप कठीण आहे; पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले आहे."
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाच्या खासदार अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांची खरी संख्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उघड करावी, असे आवाहन केले होते. सरकार मृतांची खरी संख्या लपवत आहे, असा आरोप करत महाकुंभाच्या व्यवस्थेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि बेपत्ता नागरिकांच्या शोधाची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी," अशी मागणीही त्यांनी केली होती.