कोल्हापूर : सुनील कदम
जगभर मृत्यूचे तांडव निर्माण करणार्या कोरोनावर सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात जालीम उपाय सापडेल, हे ऐकून कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र, शिराळ्यातील आयसेरा बायोलॉजिकलया जागतिक पातळीवर औषध निर्माण क्षेत्रात काम करणार्या कंपनीने 'अँटिकोव्हिड सिरम' नावाचे इंजेक्शन तयार केले आहे.
एक किंवा दोन इंजेक्शन दिल्यानंतर कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाचे विषाणू टोचून घोड्याच्या शरीरात अँटिबॉडीज् म्हणजेच प्रतिजैविके तयार करायची आणि मग अँटिबॉडीज् असलेल्या घोड्याच्या रक्तातील 'अँटिसेरा' काढून तयार केलेले इंजेक्शन कोरोना रुग्णांना दिल्यास रुग्णांच्या शरीरातील कोरोना विषाणू नष्ट होतो, अशी ही प्रक्रिया आहे. ती नीट समजून घेतली म्हणजे कोरोनाच्या जागतिक महायुद्धात शिराळ्याच्या या कंपनीने एकप्रकारे आपले घोडदळ उतरवले, असे म्हणता येईल. या इंजेक्शनच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून, मानवी वापरासाठी आता या इंजेक्शनला आधी 'ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया' आणि त्यानंतर 'इंडियन कौन्सिल ऑॅफ मेडिकल रिसर्च' तथा 'आयसीएमआर'ची परवानगी कधी मिळते, याकडे कोरोनाग्रस्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. कोरोनावरील 'कोव्हिशिल्ड' लस तयार करणार्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटशी या कंपनीचा कोव्हिडवर संशोधन आणि विकास करार आहे.
'आयसीएमआर' ही भारताची सर्वोच्च वैद्यकीय यंत्रणा आहे. कोरोना लसींनादेखील 'आयसीएमआर'च्या परवानगीशिवाय भारतात प्रवेश मिळालेला नाही. 'आयसीएमआर'ने सर्वप्रथम पुण्याच्या सिरमनिर्मित 'कोव्हिशिल्ड'ला परवानगी दिली आणि अंमळ उशिरा भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन'ला हिरवा कंदील दिला. त्यानंतरच या दोन्ही लसी रुग्णांना दिल्या जाऊ लागल्या. त्यामुळे घोड्याच्या अँटिसेरापासून तयार केलेले हे इंजेक्शनही 'आयसीएमआर'च्या परवानगीशिवाय रुग्णापर्यंत पोहोचू शकणार नाही.
कोव्हिड-19 वर इलाज म्हणून घोड्याच्या शरीरातून अतिशुद्ध अँटिसेरापासून विकसित करण्याचा प्रकल्प 'आयसीएमआर'ने गतवर्षीच जाहीर केला होता. हैदराबादस्थित एका खासगी कंपनीच्या सहयोगाने हा हा अँटिसेरा विकसित केला जाणार असल्याचे 'आयसीएमआर'ने म्हटले होते. हैदराबादच्या कंपनीचे नाव तेव्हा समोर आले नाही. आता मात्र सांगली जिल्ह्याच्या शिराळ्यातील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोरोना विषाणूचा खात्मा करणार्या 'अँटिकोव्हिड सिरम' इंजेक्शनच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्याची आनंदवार्ता दिली आहे.
सर्पदंश, विंचू, मलेरिया यावरील अत्यंत प्रभावी औषधे जगभर निर्यात करणार्या या आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचे संचालक नंदकुमार कदम आणि धैर्यशील यादव यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले की, सर्पदंश, रेबीज, धनुर्वात, घटसर्प इत्यादी रोगांवरील प्रतिजैविके तथा अँटिबॉडीज् ही घोड्याच्या रक्तामध्ये त्या त्या रोगांचे जंतू टोचूनच बनविली जातात. जगभरात याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रोगांवरील औषधे बनविली जातात. त्याच पद्धतीने घोड्याच्या रक्तात कोरोनाचे विषाणू टोचून कोरोनाचा खात्मा करणारी प्रतिजैविके आम्ही तयार केली आहेत. जगभरात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाच्या कोणत्याही स्ट्रेनवर मेड इन शिराळा 'अँटिकोव्हिड सिरम' प्रभावी ठरू शकते.
मानवी चाचण्यांची परवानगी द्या
कंपनीचे ज्येष्ठ आणि अनुभवी संचालक प्रतापराव देशमुख, डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या सहयोगातून या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. हे औषध तयार करण्यासाठी कंपनीच्या अनुभवी व तज्ज्ञ संचालकांसह तज्ज्ञ कर्मचार्यांनी गेले वर्षभर अविरत कष्ट, संशोधन आणि शेकडो प्रयोग केले आहेत. या औषधाच्या जनावरांवरील अनेक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कंपनीने आता या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी 'ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया'कडे परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसांतच तशी परवानगी मिळेल, अशी आशाही आयसेराच्या संचालकांनी व्यक्त केली. मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर 'आयसीएमआर'च्या परवानगीनंतर लगेचच या औषधाच्या प्रत्यक्ष वापराला आणि उत्पादनाला सुरुवात करणार असल्याचे कदम व यादव यांनी स्पष्ट केले.
तीन लाख डोस तयार
सध्या देशभरात निर्माण झालेला लसींचा तुटवडा आणि कोरोना रुग्णांचा जीव वाचवणार्या औषधांचीही टंचाई अशा परिस्थितीत 'अँटिकोव्हिड सिरम' हे इंजक्शन महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल. सधा प्रायोगिक तत्त्वावर आयसेरा बायोलॉजिकल कंपनीने तीन लाख डोस तयार केले असून, केंद्राच्या परवानगीनंतर दरमहा पाच ते नऊ लाख डोस तयार करण्याची कंपनीची तयारी असल्याचे आयसेराचे संचालक नंदकुमार कदम म्हणाले.
लस आणि इंजेक्शन
कोरोनाची लस दिल्यानंतर रुग्णाच्या शरिरात कोरोनाविरुद्ध लढणारी प्रतिजैविके तथा अँटिबॉडीज् तयार होतात. याला 'अॅक्टिव्ह इम्युनायझेशन' म्हणतात. मात्र एखाद्या व्यक्तीने कोरोनाची लस घेतलेली नाही आणि त्यास कोरोना झाला तर उपचाराचा महत्त्वाचा भाग म्हणून त्यास कोरोनाविरुद्ध लढणार्या अँटिबॉडीज् इंजेक्शनच्या माध्यमातून टोचल्या जातात. याला पॅसिव्ह इम्युनायझेशन म्हणतात. शिराळ्यात तयार झालेले अँटिकोव्हिड सिरम हे लस नव्हे तर इंजेक्शन आहे आणि ते रुग्णांना दिल्यास रुग्ण आजच्यापेक्षा फार गतीने बरा होऊ शकेल.