ऐतिहासिक वास्तूंवर मिळणार ‘मेड इन इंडिया’ आठवणवस्तू

पुरातत्त्व विभागाची नवी योजना
made in india souvenirs available at historical monuments
ऐतिहासिक वास्तूंवर मिळणार ‘मेड इन इंडिया’ आठवणवस्तूPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणार्‍या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशभरातील निवडक संरक्षित स्मारके आणि संग्रहालयांमध्ये आता खास ‘स्मृतिचिन्ह’ दुकाने उभारली जाणार असून, यातून भारतीय हस्तकलेची ओळख जपण्यासोबतच कारागिरांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटकांना आता भेट दिलेल्या वास्तूंची आठवण म्हणून अस्सल भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत.

दुकानांमध्ये काय मिळणार?

योजनेनुसार, एएसआयच्या अखत्यारीतील स्थळांवर असलेली सध्याची प्रकाशन विक्री केंद्रे आता नव्या स्वरूपातील स्मृतिचिन्ह दुकानांमध्ये बदलली जातील. या दुकानांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच भारतात तयार झालेल्या हस्तकलेच्या वस्तू विकल्या जातील. यामध्ये त्या त्या प्रदेशाची ओळख असलेल्या खास हस्तकलेच्या वस्तू, प्राचीन मूर्ती, नाणी, देवतांच्या प्रतिकृती आणि स्मारकांच्या महत्त्वपूर्ण भागांचे मॉडेल्स यांचा समावेश असेल. यासोबतच स्मारकांच्या इतिहासाची माहिती देणारी एएसआयची विविध प्रकाशने असतील.

कोणत्या स्मारकांचा समावेश?

एएसआयने देशभरातील 3,697 स्मारकांपैकी पहिल्या टप्प्यात 55 हून अधिक तिकीट असलेल्या स्थळांची या योजनेसाठी निवड केली आहे. यामध्ये दिल्लीतील लाल किल्ला आणि कुतुबमिनार, पश्चिम बंगालमधील हझारदुआरी पॅलेस, कर्नाटकातील गोलघुमट आणि महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांचाही समावेश आहे. याशिवाय उत्तराखंडमधील रुद्रनाथ मंदिर, उत्तर प्रदेशातील अकबराची कबर आणि केरळमधील बेकल किल्ला यांसारख्या स्थळांवरही ही स्मृतिचिन्ह दुकाने सुरू केली जाणार आहेत.

योजनेचा मुख्य उद्देश?

या उपक्रमाचा उद्देश केवळ पर्यटकांना आठवणवस्तू उपलब्ध करून देणे नाही, तर भारतीय वारसा आणि हस्तकला यांच्यात एक मजबूत नाते निर्माण करणे आहे. निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या एजन्सी या दुकानांचे व्यवस्थापन पाहतील. पर्यटकांची संख्या वाढवणे, पारंपरिक कलांचे संवर्धन करणे आणि कारागिरांना आर्थिक स्थैर्य देणे ही यामागील प्रमुख उद्दिष्टे आहेत. यातून रोजगार, उद्योजकता आणि स्टार्टअप्सलाही प्रोत्साहन मिळेल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. हा उपक्रम कारागीर, वारसा आणि पर्यटन यांना जोडणारी एक स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यास मदत करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news