

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील संसदीय शिष्टमंडळ जिनिव्हा येथे होणाऱ्या आंतर संसदीय संघ बैठकीत सहभागी होणार आहे. १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या बैठकीत 'शांततापूर्ण आणि सुरक्षित भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांचा वापर' या विषयावर चर्चा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष या विषयावर या बैठकीला संबोधित करतील.
या शिष्टमंडळात राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, खासदार भृतहरी महताब, अनुराग सिंह ठाकूर, राजीव शुक्ला, विष्णू दयाल राम, अपराजिता सारंगी, डॉ. संबित पात्रा, ममता मोहंता यांच्यासह लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी उपस्थित राहणार आहेत. ओम बिर्ला आंतर-संसदीय संघातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, आंतर-संसदीय संघाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकांना देखील उपस्थित राहतील. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य आयपीयूच्या कार्यकारी समितीच्या बैठका, चार स्थायी समित्या तसेच परिषदेच्या कामकाजाच्या सत्रांमध्ये आणि इतर बैठकांमध्ये सहभागी होतील. यादरम्यान, लोकसभा अध्यक्ष इतर संसदेच्या समकक्ष पीठासीन अधिकाऱ्यांनाही भेटतील. याशिवाय १४ ऑक्टोबर रोजी बिर्ला जिनिव्हा येथे भारतीय समुदायाला संबोधित करतील. आयपीयूमध्ये १८० संसद सदस्य आणि १५ सहयोगी सदस्य आहेत. सदस्यांमध्ये चीन, भारत आणि इंडोनेशिया सारख्या मोठ्या देशांच्या संसदेचा तसेच काबो वर्दे, सॅन मारिनो आणि पलाऊ सारख्या लहान देशांचा समावेश आहे.